अतुलनीय

प्रत्येकाला आपण कुठच्यातरी गोष्टीत इतरांच्या पेक्षा वेगळे श्रेष्ठ असावे असे वाटत असते. माणसाचा स्वभाव हा सर्व गोष्टींची तुलना करत असतो कायम. मला पहिला नंबर मिळाला पाहिजे असे तर बहुतेक सगळ्या पार्ले टिळक मधल्या मुलांना वाटावे असे शिक्षकाना जास्त वाटायचे. पहिली पासून स्पर्धा अंगात भिनविली जायची. एक तुकडी, स्पेशल कोचिंग वगैरे….मेरिट लिस्टमधे नाव येणे हे जीवनाचे साफल्यच जणू. शाळेचा निकाल चांगला लागायला मुलांमध्ये स्पर्धा असणे ही गोष्ट चांगली असली तरी कुठच्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. बरीच मुले खूप हुशार. आणि त्या योग्यतेची असूनही मेरिट लिस्ट गाठू शकली नाहीत. ज्यांना बरेच कमी मार्क होते ते फार नाखुश नव्हते पण काही मुलांची ही संधी अगदी थोडक्यात हुकली. जेव्हा मेरिट लिस्ट एका मार्काने चुकते तेव्हा असा मुलगा खूप depress होऊ शकतो.  पण असे होऊनही “मी असे काही करून दाखवेन की माझी तुलनाच होऊ शकणार नाही” असे धेय्य बाळगणारे लोकोत्तर कार्य करतात. आज अशाच अतुलनीय अतुलची गोष्ट.

अतुल हा अतिशय हुशार पण वेगळा. पहिल्या पासून स्वतः वर खूश आणि कायम हसतमुख. मला त्याच्याकडे बघून कायम शांत वाटायचे. गोल, गोरा,गोबरे गाल आणि कसलीच घाई नसलेला अभो लोकप्रिय होता. त्याच्या केसांची एक स्पेशालिटी होती. ते एक सेंटीमीटर झाले की कापायचे असा दंडक. स्पेशल कोचिंग नसताना मेरिट लिस्टच्या अगदी जवळ पोचणारा हा बुध्दिमान विद्यार्थी. त्याला केमिकल इंजिनिअर व्हायचे होते पण थोडक्यात चुकले. मग मेडिसिनला प्रवेश.  मेडिसिनला आल्यावर त्याला या विषयात खूप रस वाटायला लागला. बाकी सर्वाना ” anatomy ” मध्ये रस तर याला तो विषय आवडायचा नाही. त्याला ऋचि physiology मध्ये. मी त्याला छेडल्यावर म्हणाला “अरे anatomy मध्ये हार्ट कुठे असत ते कळते, physiology मध्ये ते कसे आणि  कधी धडकते ते कळते”. मी इंजिनियर असल्यामुळे मला उगाच रूखरूख हे शिकता येणार नाही म्हणून.असो. अर्थात physiology मध्ये खूप वर्षानी सायन मेडिकलचा विद्यार्थी म्हणून गोल्ड मेडल यानेच मिळवून दिले. पूर्वी च्या काळी  ऋषी, मुनी एक तप (१२ वर्ष) तपच्श्रर्या करायचे. आताच्या काळात त्याहून एखाद वर्ष जास्तच शिकायला लागत काही डा्ॅक्टरना. अतुल विषेष प्राविण्य,  गोल्ड मेडल आणि शिष्यव्रृत्या मिळवित intervention cardiologist झाला. पार्ले टिळकमधून प्रवास सुरू करून MBBS, MD, DM वगैरे लोकमान्य टिळक मेडिकल का्ॅलेजमधेच. टिळकांशी संबंध कायम.

अतुलचा प्रवास मुंबईहून सूरू होऊन अमेरिका, सिडनी, ओमान वगैरे करून गुजराथ मधे सुरतला थांबला. सुरतला अतुलने एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे. त्याचे “Heart first” हे clinic बर्याच गोष्टीत first बनले आहे. पेशंटची शस्त्रक्रिया अतिशय अभिनव पद्धतीने, कमीत कमी रक्त सांडून आणि बहुतेक वेळा भूल न देतासुध्दा. या पद्धतीने स्टेंट वगैरे च्या सहाय्याने अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कमीत कमी वेळेत करून रुग्णाला थोड्या दिवसात नेहेमीप्रमाणे आयुष्य जगणे शक्य होते. अतुलने आजपर्यंत ३०००० पेशंट तपासले आहेत आणि १०००० च्या वर शस्त्रक्रिया केल्या आहेत. पेशंट डा्ॅक्टर संवाद महत्त्वाचा असतो. पण स्वतः  शस्त्रक्रिया करताना त्याच पेशंटशी संवाद साधू शकणारे असे फारच थोडे असतील.

अतुलची आजपर्यंत १०० च्या वर आर्टिकल जगातल्या प्रसिद्ध मासिकात छापून आली आहेत. तो तीन मोठ्या जर्नलचा संपादक आहे. त्याने आतापर्यंत ३० हून जास्त क्लिनिकल ट्रायल मध्ये प्रमुख रिसर्च ऒफिसर म्हणून काम केले आहे. म्हणजे बरीच नवीन ऒषधे बाजारात याच्या कामामुळे आली. मी त्याला एकदा विचारले की काय रे नवीन ऒषधे आजार बरा करतात पण त्यांचे साईड इफेक्ट एवढे का असतात? तो म्हणाला “Everything under the sun including the sun has side effects” नवीन ऒषधे असाध्य रोग बरे करू शकतात हे महत्त्वाचे, लहान साईड इफेक्ट बरे करायला आपल्याला येतच. तो एका स्टेंट बनविणार्या कंपनीचा डायरेक्टर सुद्धा आहे. एवढे रिसर्च चे काम सतत करत राहणे खूप कठीण गोष्ट आहे. कधी कंटाळा येतो का असे विचारल्यावर म्हणाला. “Research is an obligation not hobby”. आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून हा वसा घेतलाय त्याने.

इतक्या वर्षात इतक्या केसेस बघून आता तू कुठचही ओपरेशन पाच मिनिटांत करत असशील ना या प्रश्नावर हसला. म्हणाला ” मानवी शरीर कायम तुम्हाला सरप्राईज देत असते. जी केस पाच मिनिटाची सरळ वाटते ती खूप गुंतागुंतीची ठरू शकते त्यामुळे कधीच वृथाभिमान नसावा. मी नतमस्तक.

अभोने पार्ल्याशी नात अजून जपले आहे. तो सुरतमध्ये राहतो त्या एरियाचे नाव आहे “पार्ले पा्ॅईंट”. नाव त्याच्या मुळे पडले हे साफ नाकारतो पण.

अतुल ने तरूणपणी I.N.T. नाट्यस्पर्धा गाजविल्या,बक्षिसे मिळविली पण आता या आवडत्या छंदासाठी वेळ कमी मिळतो. पर्यटन हा छंद मात्र जोपासला आहे. ४४ हून आधिक देश फिरून झाले आहेत. स्वयंपाक हा छंद मात्र अजून जपलेला आहे. सिडनीत बॅचलर लाईफ मधे अतुल बाकी सह अध्यायांसाठी कूक बनला होता. एकदा तर त्याने ३० लोकांसाठी स्वयंपाक केला होता. सतत नवीन पदार्थ बनविणे आणि त्यांच्यात काय सुधारणा करता येईल हा विचार करणे हा त्याचा सध्याचा विरंगुळा . त्याला पाककृती बरोबर त्याचे प्लेटींगही ( वा काय जमलय ना मलापण नीट शब्द वापरणे) छान जमते. आता एक रेसिपी बुक लिहितोय म्हणतो.

अतुलची मुलगी तिच्या आवडीप्रमाणे computer science मध्ये B.S. करत आहे अमेरिकेत. तिला प्रेस्टीजियस कंपनी salesforce मध्ये internship मिळाली आहे. पुढे वडिलांच्या प्रमाणे यशस्वी होईलच.

जसे ध्रुवाने अढळपद मिळविले होते तसे अतुलने सुरत मध्ये लोकांच्या ह्रदयात अढळपद मिळविले आहे यात शंका नाही. मराठ्यांनी पूर्वी सुरत लुटली तसे अतुलने सुरतवासियांची ह्रदये लुटली असही म्हणता येईल.

 

मिजो

कारे भुललासी वरलिया अंगा.

आपल्या सभोवती असे बरेच लोक असतात की ते जसे असतात त्यापेक्षा खूप वेगळे आहेत असे दाखवतात. काही लोक हा मुखवटा नीट घालू शकतात. बरेच लोक हा प्रकार आपल्या स्वार्थासाठी करतात आणि आपण आहोत त्यापेक्षा खूप चांगले आहोत अस दाखवत असतात. काही लोक मात्र आपला मोठेपणा लपवून आपण इतरांसारखे सामान्य  आहोत अस दाखवितात. असे केल्याने इतर लोक त्यांना आपल्याच सारखा समजून आपल्या वर्तुळात सामील करून घेतात. आजची गोष्ट अशाच आपल्या कोटीभास्कर आणि अर्थतज्ञ चंद्रहासची. काही स्वकष्टार्जित आणि काही वारसाहक्काने मिळालेल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर उच्च पदावर काम करूनदेखील सामान्य लोकांच्या बरोबर मिसळून काम करणारा अवलिया म्हणजे चंदू. त्याच्या कायम कोट्या करण्याचा अट्टाहासापायी तो कधी कधी थिल्लरही वाटू शकतो पण तो आहे त्याचा वरचा मुखवटा. आतला प्रगल्भ economist बर्याच लोकांना माहीत नाही.

मुख्यमंत्री कोणीही असला तरी बरेचदा हाच सल्लागार असतो. चंदू प्रेस्टीजियस planning commission च्या एका वर्क ग्रृपचा हेड होता. महाराष्ट्र इकॅानॅामिक डेवलपमेंट कॅांसिलचा CEO होता बरीच वर्षे. त्याला काही वेगळे इवेंट झाले, बजेट आले वगैरे की टीवी वाले अभिप्राय द्यायला बोलावतात, आणि हुशार लोक तो अभिप्राय ऎकतात (कारण आम्ही कधी ऎकला नाही म्हणून) . त्याने लिहिलेले एक पुस्तक प्रसिद्ध आहे. दुसरे आता थोड्याच दिवसात पब्लिश होईल. अशा मान्यवर economist ची आपल्या कडून थोडी “अतिपरिचयात अवज्ञा” होत आहे असे वाटते.

चंदूला लहानपणापासून वडिलांकडून खूप छान शिकवण मिळाली.  स.ह.देशपांडे अतिशय प्रखर विज्ञानवादी, सावरकरप्रेमी, अर्थशास्त्राचे प्राध्यापक, विचारवंत आणि साहित्यिक. आपण सर्वानी ज्या लेखकांची नावे धड्यांच्या शेवटी वाचली त्यातले बरेच त्यांच्या घरी येत असत. पु.ल.देशपांडे तर विशेष आपल्या सर्वांच्या आवडीचे. चंदूने त्याचा PHD चा शोध निबंध त्यांच्या वाढदिवसाला सादर केला. त्याने तसे त्यांना फोनवर सांगताच पुल म्हणाले ” हा तुमच्या मधे अनुवांशिक रोगच आहे”.

चंदू लहानपणी इतरांसारखा सायन्सला आला.  वडिलांनी कधीच कसलीही सक्ती केली नव्हती . ११वीत असताना मात्र त्याला आपला निर्णय चुकला असे जाणवले. ४० वर्षापूर्वी एकदा ११वीत सायन्स घेतलेल्या हुशार विद्यार्थ्यांने  १२ वीत आर्टस घ्यायचे म्हणजे मोठाच धाडसी निर्णय होता. लोकापवाद, चेष्टा वगैरे …. चंदूला मात्र कळून चुकले होते की आपल्याला जे आवडतय तेच करायचय. मग पाणी वळणावर गेलेच. बीए,एम ए,  Industrial pricing ह्या विषयात PHD पर्यंत आवडीचे क्षेत्र. आमच्या मित्र मंडळीत मात्र असा समज होता की तो आर्टसला  तिथे असणाऱ्या मुलींच्या मुळे गेला वगैरे..

अर्थात त्याने १२ वी लाच का्ॅलेजमधे प्रथम क्रमांक घेऊन आपला निर्णय किती योग्य होता ते दाखवून दिले. Economics हा अतिशय रूक्ष विषय आहे असे माझे मत. त्यामुळेच बहुतेक त्याला कोट्या करायचा विरंगुळा जडला असावा. मी त्याच्या कोट्या इथे परत देऊन उगाच टाईम पास करत नाही. जिज्ञासुनी कधीही काहीही लिहून whatsapp करावे (त्याला एकट्याला) . नंतर मला विचारू नये कसे थांबवू याला म्हणून .

आधी युनिवर्सिटी मग टाटा सन्स आणि नंतर महाराष्ट्र इका्ॅना्ॅमिक काउंसिल मधे विविध जबाबदाऱ्या. आता चंदू वेलिंगकर मधे मॅनेजमेंट शिकवतोय. आजवर साठ एक आर्टिकल्स छापून आली आहेत. या श्रेत्रात आज चंदूचे नाव मोठे आहे. त्याचे मनमोहन सिंग हे आदर्श पण मोदींचे पण महत्व जाणतो.

चंदू सर्वाना बरोबर घेऊन जाण्यात अनुभवी आहे आणि जनरली सर्वांना acceptable. १० वर्षापूर्वी आपल्या पार्ले टिळकच्या बॅचचे माजी विद्यार्थी संमेलन ठरले तेव्हा सर्वानुमते चंदूच अध्यक्ष ठरला. तसे सगळेच हुशार (स्वतः ला समजणारे) पण याच्या नावावर मात्र एकमत. बरेच इच्छुक होते पण हा अजूनही टिकला आहे आणि निवृत्तीचा विचार नाही.

चंदूला म्हटले तुमचे बरे आहे. तुम्ही सल्ला देता त्याचा इका्ॅना्ॅमीवरचा इफेक्ट कळायला दहा वर्षे जायला लागतात. आम्हाला दर महिन्याला सेल्सचे नंबर दाखवावे लागतात. डा्ॅक्टराना पेशंट पटकन बरा करायला लागतो. चंदू म्हणाला तुम्ही सगळे symptoms वर उपचार अथवा काम करता. आमचे काम economy च्या मुळाशी जाऊन बरे करण्याचे असते. आज तुम्हाला चांगले काम मिळाले आहे आणि पैसे मिळताहेत कारण कोणीतरी economist ने १० वर्षापूर्वी काम करून ठेवले आहे. मला काही विशेष पटले नाही पण असेल सुध्दा तो म्हणतोय तर. असो.

चंदूचा विक पा्ॅइंट म्हणजे क्रिकेट आणि संगीत. अर्थात जरी क्रिकेटचे बरेच रेका्ॅर्ड पाठ असले तरी त्याची रेका्ॅर्ड गावस्करवर अडकली ति पुढे सरकलीच नाही. त्याच्या मते गावस्कर रिटायर झाल्यावर सर्व संपले. हा आता मॅचेस बघत नाही. क्रिकेटचा भगवान मानला गेलेला सचिन सुध्दा याच्या मते थोडा कमीच. या त्याच्या मतांवर आमच्या बर्याच वन डे रंगतात. संगीतात भीमसेन, कुमार गंधर्व आणि किशोरी अमोणकर ही दैवते. अर्थात घरची गोष्ट वेगळी. घरीच डा्ॅक्टर आणि तीही संगीतातली असल्यामुळे भीमसेनांवर बोलून थांबता थोडच येणार?  हल्ली भूप ते भैरवी आणि मधले जोड राग नीट ओळखता आले तरच जेवण असा प्रकार.

चंदूला संगीतात ऋचि आणि जाण आहे. पूर्वी पेटी छान वाजवायचा. अर्थात त्याची पत्नी मीनल या श्रेत्रात खूप श्रेष्ठ. तिने जोड राग या विषयात संशोधन करून PHD घेतली आहे. ती एक प्रसिद्ध गायिका आहे. तिचे शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात. कन्या अपूर्वा छान गाते , अमेरिकेत मुलाना शिकविते आणि cryptography मधे संशोधन (PHD) करत आहे बोस्टनला तर जावई MIT मधे. थोडक्यात काय सर्व उच्च विद्या विभूषित आणि कलावंत.  चंदूची स्वतः ची industrial pricing वर PHD असली तरी मार्केटमधून घरी आल्यावर त्याला बायकोला हिशेब द्यावाच लागतो असे कळते. असो. सुखी संसारी माणसाचे रहस्य त्याला कळले आहे. काही विचारले तर ह्याचे “हिला विचारून सांगतो”. मी त्याला थोड छेडल्यावर म्हणाला “आमच्या घरी हिच्या समोर रागात बोलायची सोय नाही”.

चंदूला विचारले तुझा बॅचमेट्स साठी काही संदेश वगैरे ? बराच विचार करून म्हणाला” मी रिटायर वगैरे होत नाहीये आणि आपल्याकडे impeachment ची सोय नाहीये.”

 

मिजो

कूल दीपक

आपण सारे समाधानी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण समाधान मात्र मृगजळासारखे असते. एखादी गोष्ट मिळाली कि आपल्याला समाधान मिळेल असे वाटते. पण त्या टप्प्यावर आल्यावर आपल्याला पुढची गोष्ट खुणावते आणि आपण काय मिळवले आहे त्याच्यात समाधान मिळत नाही. आहे त्यात समाधानी असणारे लोक एकूणच कमी. पूर्वी आपल्याला एक संकल्पना सांगितली जायची. “सुखी माणसाचा सदरा”. हा घातला कि माणूस सुखी, म्हणजे इतर काही करायला नको. मला याचा शोध लागलाय . पार्क रोड वरील आचार्य निवास मध्ये हा असा सदरा कायम घातलेला माणूस राहतो.  आज ह्याच कुलदीपकाची गोष्ट.

दीपक शाळेत असताना खेळातच ऋचि असलेला बुद्धिमान विद्यार्थी होता. एक तुकडीचे आकर्षण त्याला कधी नव्हते, आणि त्यात नसण्याचा त्याला किंवा कोणालाही कमीपणा वाटत नसे. खेळात मात्र कायम पुढे रहायचं ठरलेले. व्हा्ॅलीबा्ॅल, क्रिकेट आणि इतर मॆदानी खेळात टीममध्ये कायम. इंग्लिश मीडियमला आल्यावर मात्र त्याच्यात बराच बदल झाला. आपण अभ्यास केला तर आपल्याला बरे मार्क मिळू शकतात हे कळले. पण अजून आतून आवाज आला नव्हता. प्रिलीमचा रिझल्ट वाईट आला आणि खेळ थोडे दिवस बंद झाले. नंतर खरा अभ्यास आणि मग जल्लोश. वडिलांच्या इच्छेनुसार CA व्हायचे ठरले. इतर मित्र बरोबर होतेच. अर्थात CA चे विषय कठीण आणि निकाल अगदी कडक.  इथे मनोनिग्रह लागला. अनेक वेळा एकाच विषयाचा अभ्यास करणे आणि पहिल्यापेक्षा जास्त, हे खूप सत्वपरिक्षा बघणारे. यावेळी अंगभूत हुशारी कामास आली. एखादा विषय येत नसेल तर तो मित्राकडून शिकण्यात कुठचाही कमीपणा समजला नाही त्याने. मेहनत प्रचंड केली. काही विषयाची पुस्तके इतकी जाड आणि वजनदार होती कि व्यायामाला उपयोगी पडली असती. मला आठवतंय त्या पुस्तकात मी कुठचही पान काढून त्यावरचा प्रश्न विचारायचो. दीपक सर्व मुद्दे एका पाठोपाठ सांगू शकायचा. काही विषय मात्र केवळ आवडत नाहीत म्हणून अभ्यासच करायचा नाही. मनस्वी दीपक कधीच या मार्कांच्या रेसमध्ये उतरला नाही. इतरांशी तुलना हा विषयच नव्हता.

मला पटकन का मिळाल नाही ही सल असू शकते कधी कधी  पण इतरांना माझ्यापेक्षा जास्त का अशी असूया कधीच नव्हती. हा फरक महत्त्वाचा वाटला मला त्याच्या विचारात. बर्याच  ठिकाणी नोकर्या केल्या त्याने. प्रत्येक ठिकाणी हा पा्ॅप्युलर. बोलण्यात कसलाही विधिनिषेध न बाळगता निर्मळ मनाने सर्वांची खिल्ली उडवण्यात ह्याची एक्स्पर्टाईज. सर्वासमोर मी सामान्य आहे असे अभिमानाने सांगणारा आणि स्वतः च आपली खिल्ली उडवणारा दीपक कूल आहे हे सार्वमत आहे. आपल्याच नाही तर नंतरच्या पिढीत सुद्धा दीपक कूल म्हणूनच लोकप्रिय आहे.

त्याने वेळेआधी निवृत्ती विचारपूर्वक घेतली पण कारण विचारले तर आता नवीन लोकांसमोर आपली धडकत नव्हती अस उगाचच म्हणतो. बहुतेक लोकाना आपण किती धनसंचय केला म्हणजे निवृत्त होऊ शकतो याचा अंदाजच नसतो. आपल्या पॆशाच्या गरजा किती आहेत आणि किती असतील याचा अंदाज असणे हा खरोखरच कठीण प्रकार आहे. दीपक CA असल्यामुळे हे त्याला खूप लवकर कळले. गरजेपेक्षा जास्त जमा असल्यामुळे आणि दीपकचा सदरा सुखी माणसाचा असल्यामुळे आहे त्यात खुश असणे हा स्थायिभाव असल्यामुळे  मनात आले आणि झाला निवृत्त. आता आरामात वाचन आणि लेखन. आम्ही पार्लेकरमध्ये लेखमालेसाठी आमंत्रण आल. खुसखुशीत लिखाण सर्वानाच हवे असते. वक्तृत्व स्पर्धा शाळेपासून गाजवणारा दीपक कुठल्याही विषयात जोरकसपणे मुद्दा मांडू शकतो. त्याची लिहिण्याची आणि बोलण्याची एक वेगळी विनोदी शैली आहे. लेखन लोकाना आवडतय असे दिसतयं. लेखनाबरोबर गायनात पदार्पण करतोय. काही महिन्यात स्वतःची स्वतंत्र मॆफिल आयोजित करून गाजवणार आहे. गायनात थोडेच दीपस्तंभ भीमसेन, उस्ताद आमिर खान, मालिनी राजूरकर आणि  अभिषेकी बुवा बाकी सर्व नगण्य. मी त्याला एकदा कुमार गंधर्वांचा मोठेपणा सांगत होतो. हा म्हणतो मला आवडत नाहीत.  मी म्हटले का ते सांग. तर याचे उत्तर “असतील चांगले पण त्यांचे गाणे मला कळत नाही”.  असो.

त्याचा गायन अभ्यास सुरू आहे. सध्या लयीचा थोडा प्रा्ॅब्लेम आहे, सुरांचा अभ्यास मात्र जोरात सुरू आहे. आम्ही योग्य तो हा्ॅल मिळाला कि सर्वाना आमंत्रण देऊच.

आपला आत्मविश्वास अबाधित ठेऊन अहंकार जागृत होऊ न देणे यासाठी तपच्श्रर्या लागते म्हणतात. दीपक कडे बघितले कि असे वाटते हा माणूस जन्मतःच हे कोड सोडवून आला. आपण आहोत तसेच मस्तच आहोत हा पार्ले टिळक चा स्थायिभाव झाला. मग केसाना रंग लावणे, तरूण दिसण्यासाठी प्रयत्न करणे याच्या कधीच मनात आल नाही. आपण आहोत तसे नाही आणि कोणीतरी वेगळे आहोत अस भासविण्याची गरज नसली कि सुखी माणसाचा सदरा सहज मिळतो असे म्हणतात. बहुतेक सर्वाना office मध्ये “सर तुम्ही आहात म्हणूनच हे साध्य झाले” असे ऎकायचे असते. आत्तापर्यंत अशा reassurance ची गरज दीपकला कधीही वाटली नाही त्यामुळे तो सुखीच राहिला.

फोटोग्राफिक मेमरीअसलेल्या दीपकचे लक्षात ठेवायचे विषय मर्यादित असतील पण क्रिकेट बद्दल विचारा. इतर सर्वाना सहज हरवेल. सगळे रेकॉर्ड याला पाठ. इंग्लंड ला गेल्यावर मुद्दामहून Lords चे मॆदान बघायला गेला. तिथला ब्रिटिश गाईड गॅलरी वगैरे दाखविताना खिजवत म्हणाला.” तुमच्या भगवानाला (सचिनला) या मॆदानावर शतक मारता आले नाही”. दीपकने शांतपणे उत्तर दिले. “ते काम त्याने त्याच्या बोलरला (आगरकर) सांगितलं होत”. तो गाईड दीपकशी बोलायला परत आला नाही.

दीपक खरा म्हणजे आळशी आहे पण मित्रांसाठी काहीही करायला तयार. परत मी असे तुझ्यासाठी केले असे कधीही बोलून दाखविणार नाही किंवा इतर कोणासमोर फुशारकी नाही. एकदा एखादा माणूस आपला म्हटला कि हा कमरेचे सोडून द्यायला तयार. असे बरेच परोपकार कोणालाहि नकळत करतो अगदी धर्मपत्नी माधवीला सुद्धा कळू देत नाही. म्हणजे ती नाही म्हणेल असे नाही पण उगाच चर्चा नको वगैरे.

अभिषेकींचे गायन सोडल्यास दीपकला जाज्वल्य अभिमान देशस्थ असण्याचा. तरी त्याची आई आणि पत्नी मुळचे कोकणस्थ.  तुम्हाला वेळ छान घालवायचा असेल आणि साधारण दोन तास मजेत जायला हवे असतील तर उगाचच “देशस्थ बेशिस्त ” वगैरे चालू करा. नंतर तुम्ही काहीही बोलला नाहीत तरी चालेल. कोकणस्थ किंवा कर्हाडे किंवा CKP कसे वागतात याची सविस्तर माहिती कळेल.

मनाची निर्मळता अजूनही जपलेल्या याच्या कुठल्याही बोलण्यावर सहसा कोणी चिडत नाही. उगाचच कोणाची स्तुती न करणारा दीपक कधीच देखल्या देवा दंडवत घालत नाही. पुण्याला न राहता पुणेकराना लाजवेल असे तिरकस बोलू शकणारा पण तारतम्य बाळगून मित्र परिवाराला कायम हसत ठेवणारा दीपक असाच तेवता राहू दे हीच सदिच्छा.

 

मिजो

योगी कर्माचा.

आपण बरेच लोक बघतो जे बोलण्यात हुशार असतात, सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय सुचवतात, बिनतोड युक्तिवाद करू शकतात पण बहुदा असे लोक स्वतः मात्र सांगितलेली  गोष्ट करून दाखवू शकत नाहीत. याउलट कुठलीही गोष्ट जर इतर कोणाला जमत असेल तर मी ती करून दाखवेनच असा आत्मविश्वास असणे ; त्यातली हवी ती गोष्ट प्रेरित होऊन करणे हा मनस्वी पणा असणे आणि एखादी गोष्ट ठरवल्यावर कितीही समस्या आल्या तरी पुर्ण करणे म्हणजे “ययाति “.

गेली ५०+ वर्षे हे वादळ आमच्या भोवती असले तरी आम्हाला त्याची गति, वेळ आणि दिशा या कायम unpredictable राहिल्या आहेत. या मुलाचे पाय आम्ही पाळण्यात पाहिले नाहीत कारण आम्हीपण तेवढेच असू, पण शाळेत या श्रीक्रृष्णाच्या मुलाने सर्व बाबतीत नाव कमावले. त्याच्यामते तो बरोबर असेल तर (बहुतेक वेळा तसच वाटायचे त्याला) कितीही मार खाऊनसुद्धा त्याचा attitude कधीच नरमला नाही. हुशार इतका कि आवडीच्या विषयात मास्तरांना शिकवेल. अभ्यास करण्याची त्याची एक वेगळी पद्धत होती. विषय समजून घेणे महत्त्वाचे, मार्क दुय्यम. त्यामुळे कदाचित १० पर्यंत त्याला वरचा क्रमांक कधी मिळाला नाही. नंतर मात्र CA ची परीक्षा जेवढी कठीण तेवढे जास्त मार्क आणि प्रथम प्रयत्नात पास, मेरिट लिस्ट आणि काही विषयात सुवर्ण पदक हा त्याच्या अंगभूत हुशारी आणि प्रचंड मेहनत यांचा परिणाम. वयाच्या जेमतेम २१ व्या वर्षी हा गोल्ड मेडालिस्ट CA त्यावेळच्या प्रतिथयश A.F.Ferguson मध्ये सन्मानाने बोलविला गेला. पण सरळ नोकरी करणे किंवा कुठचीही एक गोष्ट फार काळ करणे हे त्याच्या DNA मध्ये बसतच नव्हते .

यानंतर दोनच वर्षात नोकरी हा आपला प्रांत नाही असे त्याला वाटल्यामुळे उद्योग जगत एका future CEO ला मुकले. नंतर स्वतः ची CA firm, आणि partnerships करून झाल्या. मग महाशय बिल्डर झाले आणि ते सुध्दा पार्ल्यात आणि पुण्यात. तिथे यश मिळाल्या वर साहजिकच कंटाळा येणे क्रमपात्र होते. आता ठरले शेती आणि फलोत्पादन. आधीचे सर्व लोक अयशस्वी झालेत कळल्यावर हा उतरणारच त्यात. एकदम दिडशे एकर, दहा हजार आंब्याची झाडे वगैरे ..ते यशस्वी झाल. त्यानंतर एकदा २००१ च्या सुमारास हा मला दापोलीला एका डोंगरावर घेऊन गेला. साधारण झुडपे, असंख्य काटे , लाल काळा कातळ,  रणरणते ऊन, पायवाटही नाही अशा परिसरात त्याच्या पाठी फिरताना मी पूर्ण दमल्यावर तो एका उंच ठिकाणी थांबला. समोर हात दाखवून म्हणाला “इथे पाण्याची टाकी ,५०००० लिटरची, पुरेल ना?”. मला काहीच दिसले नाही. वर ऊन. तहान लागलेली आणि हा पाण्याची टाकी वगैरे.  मी “कुठे?” “कशाला?”. “इथे १०० बंगलोंचे प्रोजेक्ट करतोय. तुला काय XXXX उगाच आणलय का? XXXX. आत्ताच्या आत्ता पाईपिंग डिझाईन करायचय. आत्ता माझ्या डोक्यात उजेड पडला. आता बंगलो, प्लॅाट डेव्हलपमेंट, NA आणि हॊटेल इंडस्ट्री वगैरे … हेच आर्यावर्त .

आर्यावर्त ने ययातिला बरीच प्रसिद्धी आणि हवे ते स्थॆर्य दिले. अर्थात त्याच्याच मते हे सर्व्हिस इंडस्ट्री त्याला कळायला, त्यात रूळायला आणि एवढे यशस्वी व्हायला भारीच पडले. समोरचा customer कितीही बिनडोक असला आणि त्याने काहीही अवाजवी मागितले तरीही आपण हसतमुख राहून त्याला पटेल असे उत्तर देणे आणि त्याचे समाधान करणे हा खूप कठीण असा योग आहे. ययाति यात किती यशस्वी आहे हे त्याचे सर्व customer सांगतीलच. आर्यावर्त चे यशस्वी  monetisation करून त्याने आता तिथेच The Mango Inn. सुरू केलय आणि ते मुलाकडे आणि सुनेकडे सोपवून रिटायर होण्याच्या मार्गावर आहे.

तो रिटायर वगैरे बोलल्यावर मी त्याला बकेट लिस्ट केली का विचारले. “अरे हट, मनात आल्यावर ती गोष्ट न करू शकणारेच लिहितात, मी करून टाकतो त्यामुळे लिहून ठेवायची गरज नाही.” मग मी त्याला जीवनविषयक द्रृष्टीकोन विचारला. “माझा DP बघ.” LOVE THE LIFE YOU LIVE THE LIFE YOU LOVE. यामध्ये LIVE हा शब्द खरोखरच महत्त्वाचा . हव तस बिनधास्त जगणे हे याच्याकडून शिकावे.

ययाति मनस्वी आहेच पण street smart हि आहे. अन्यथा या सर्व गोष्टी करताना निभाव लागणे कठीण . अर्थात जसे त्याला कोणी  फसवू शकत नाहीत तसेच उगाच लुबाडणूक करणे त्याच्या मनाविरूद्ध . आत्ता काही वर्षापूर्वी सरसकट कर्जमुक्ती जाहीर झाल्यावर हा बॅंकेत जाऊन अर्ज देऊन आला, मला कर्ज माफी देऊ नये. गॅस सब्सिडी पहिल्या प्रथम  परत करणारा हाच अवलिया.

या सर्व गोष्टी एक माणूस एकाच जन्मात करू शकतो हे समजणे सुध्दा कठीण आहे. कुठलीही नवीन गोष्ट करताना त्याचा पूर्ण अभ्यास करणे हा नियम. त्यामुळे बहुतेक वेळा यश हमखास.

या सर्व गोष्टी करताना त्याला उज्वलने दिलेली साथ आणि उचललेली जबाबदारी शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे.

असा ययाति रिटायर होणे अशक्य आहे. आत्ताच भेटला तेव्हा wine making वाचत होता. म्हणाला, बारा प्रकारच्या wine करणारे. पुढे  म्हणाला मी मल्ल्या चे चरित्र वाचतोय. मला कर्ज नकोय. पण The mango inn साठी calendar काढणार आहे. त्यासाठी models शोधणार आहे.

तुम्हाला कोणाला मदत करायची असल्यास त्याच्याशी त्वरित संपर्क करा.

मिजो.

अन्वयार्थ

एखाद्या गोष्टीचा व्यवस्थित तर्कशुद्ध विचार करून शोधलेले सत्य आणि तात्पर्य म्हणजे अन्वयार्थ . केवळ वरवर दिसणारे कारण न बघता, त्याचा अर्थ आणि आतला आशय यांचे निरूपण म्हणजे अन्वयार्थ. आपण आपल्या प्रत्येक कृतीला जर अन्वयार्थ ही बॆठक अनिवार्य केली तर आपले वागणे सर्वाना उपयोगी ठरेल.  अर्थात त्या साठी हेतू चांगला हवा. समाजाला उपयोगी असा हेतू घेतला, वॆचारिक बॆठक अन्वयार्थावर आधारित असेल आणि त्याला जलद कृतीची जोड दिली तर  स्पृहणीय कामे होतात. आज आपण अशाच एका अन्वयाची गोष्ट ऎकणार आहोत.

अन्वय हा तसा हुशार विद्यार्थी पण त्याला खेळात जास्त ऋचि. क्रिकेट, व्हॅालीबॅाल, कबड्डी मध्ये विशेष नॆपुण्य. घरी सर्व इंजिनियर म्हणून तेच व्हावे असे वाटत होते. पण वडिलांची इच्छा त्याने डॅाक्टर व्हावे. बारावी नंतर वॆद्यकिय शिक्षणाची संधी मिळत नाही दिसल्यावर इंजिनियरींग कॅालेज जॅाईन केले. एक महिना झाला आणि एकदा वर्ग सुरू असताना बाहेर भाऊ टेलिग्राम घेऊन आला. मेडिसिनला शेवटची सीट मिळाली होती. J.J. ला ऍडमिशन, रॅगिंग सगळे यथासांग पार पडल्यावर मनोनिग्रह झाला. नंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. सर्वाना मागे टाकून MBBS आणि MS पहिला क्रमांक. J.J.मध्ये अक्षरश: जो  जे वांच्छिल असा वागला. नंतर पुढचा अभ्यासक्रम K.E.M. मध्ये cardiac surgery. आधीचा जोक Kill Every Man पूर्णपणे पुसून टाकण्याचा निर्धार वगैरे . बर्याच वेळा पेशंटना स्वतः पॆसे देऊन मदत. अनुभवसंपन्न शल्यविशारद झाला पण स्वतः चा शोध चालू च.

त्याच्या तीस वर्षाहून जास्त करियरमध्ये इंग्लंड, अमेरिका ,वेस्ट इंडीज बेटे यातला अनुभव वाखाणण्यासारखा. बहुतेक मोठ्या इस्पितळात ह्रदयविकारावरील उपचार विभाग चालू करून नावारूपाला आणण्यासाठी लागतात ती सर्व skills असल्यामुळे सतत मागणी आहेच. भारतात असताना काही वर्ष सुरत आणि पुणे येथे काम केले. नंतर मोठ्या अंबानी हॅास्पिटलचा cardiac surgery section मोठा केला. अर्थात काही ठिकाणी मनस्वी पणामुळे मतभेद झालेच. पण इथे त्याचे प्रिंसिपल “हर फिक्रको धुवेमे उडाता चला गया. मॆ जिंदगीका साथ निभाता चला गया”.

आजच्या मेडिकल जगातले कमीशन शास्त्र मात्र त्याला कधीच आवडले नाही आणि जमले नाही. अर्थात अर्थार्जनासाठी काहीही करणारे लोक त्याला वेडा म्हणत असतील.

अन्वयला समर्थ साथ करणारी संज्योत स्वतः सगळ्या adjustment करून कायम हसतमुख कशी हे कोडेच आहे. कन्या प्रमथा बापसे बेटी सवाई बनेलच. पुत्र पार्थ स्वतःच्या आवडीच्या अभियांत्रिकी क्षेत्रात चमकेल अशी आशा.

अन्वयला खर्या अर्थाने जगमान्यता मिळाली ती फोर्टीसमध्ये त्याच्या ह्रदय प्रत्यारोपणातील यशाने. केवळ शस्त्रक्रिया येऊन चालत नाही तर चार तासात लोजिस्टिकचे गणित जमवून, वेळप्रसंगी स्वतः पॆसे खर्च करून त्याने आतापर्यंत  अशा जीवनदानाची शंभरी गाठल्ये जवळपास.

मनस्वी अन्वय आध्यात्मिक अंगाचा. एकदा Trinidad Tobago मध्ये समुद्र किनार्यावर एका खडकावर त्याला द्रुष्टांत झाला. एका अलॊकिक प्रकाशाकडे ओढला जाऊन समुद्रात चालत गेला. कोस्ट गार्ड नी त्याला आपल्यात परत आणले. या अनुभुतीनंतर जीवनात आपण कोण आहोत आणि आपण काय करायला हवे याचे पक्के मत बनवले आणि भारतात येऊन त्याच्याकडून अलॊकिक कार्य झाले.

मी त्याला एकदा चेष्टेने म्हटले कि तू ह्रदय म्हणजे एका hydraulic pump चेच जोडणीचे काम करतोयस. त्यात एवढे मोठे काय? बहुतेक junior engineer सुद्धा हे करू शकतील . मला वाटले हा आता बहुतेक खूप चिडणार पण तो शांतपणे म्हणाला. “तुझे म्हणणे बरोबर आहे. जोडणी चे काम सारखेच असते. फक्त इथे पंप चालू असताना काम करायचे असते आणि fluid गळून चालत नाही.”

अन्वयला आता आणखी काय करणार असे विचारले. म्हणाला माहित नाही. आपण निमित्त मात्र. मी फक्त observer असतो. माझे हात तो वरचा चालवतो. मी वर बघितले मला काही कोणी दिसले नाही. असो.

अन्वयची आयष्याबद्दलची मते अशीच स्तुत्य वाटली. त्याच्यात शब्दात.

“आपले आयुष्य नॆवेद्याच्या ताटासारखे असते. एखादी गोष्ट खूप आवडली तरी जास्त मागता येत नाही आणि एखादी गोष्ट आवडली नाही तरी टाकून देता येत नाही. प्रत्येक गोष्ट जितकी मिळाली ती खाणे हाच खरा धर्म.”

मी विचार करतोय अजून.

हा मात्र इतरांच्या ताटातील त्यांची आवडती गोष्ट संपल्यावर ती वाटी अमृताने भरतोय.

अन्वय,

समुद्रमंथन करून मिळालेले अम्रूत तू असच वाटत रहा आणि इतरांना हलाहल पिऊनही सुखी कसे राहता येईल हे दाखवत रहा.

मिजो.

तृप्ति

आपण सर्व सुखाच्या पाठी धावत असतो. कशात सुख मिळेल हे जरी व्यक्तीसापेक्ष असले तरी त्याच्यापाठी धावणे समान आहे. बर्याच वेळा एखादी गोष्ट मिळाली कि आपला तिच्याकडे बघायचा द्रुष्टिकोण बदलतो. मग आपल्या लक्षात येते कि आपण सुखाच्या मागे धावतो पण एखादी गोष्ट आपल्याला चिरकाल सुख देत नाही आणि आपल्याला खरी हवी असते ती तृप्ति.

सुख,समाधान चिरकाल मिळाले कि होते ती तृप्ति. आपण सर्व जण जिच्या शोधात असतो ती. खुप भूक लागली असल्यावर आवडते खाणे भरपूर होऊन ढेकर आल्यावर होते ती.

अशी तृप्ति आपल्या आयुष्यात असावी यासाठी आपण बराच प्रयत्न करतो आणि  ती  हुलकावणी देत असते. अर्थात यामध्ये मुख्य  अडचण असते ती म्हणजे आपली स्वतःची मानसिकता. माणसाला आपले problems हे खुप मोठे वाटत असतात. प्रत्येक वेळेला काहीही झाले तरी हे मलाच का झाले , इतर कसे सुखी आहेत वगैरे प्रश्न पडतात. असे असल्यास तृप्ति जवळ फिरकणारच नाही.

आपण आज एका “तृप्ति”ची गोष्ट ऎकणार आहोत.

ही मराठी मुलगी, तशी सामान्य मुलींप्रमाणे मोठी झाली. लहानपणी खुप सुंदर. हुशार असलेली तृप्ति योग्य वयात शिस्तीत लग्न करून संसार करू लागली. एक मुलगा एक मुलगी अशा आटोपशीर सुरेख संसारात रमली. संसार छान झाला पण, तिच्या वाट्याला आले बरेच अपघात, शस्त्रक्रिया आणि नवर्याचा अकाली मृत्युने वियोग. मुलगा परदेशी स्थायिक आणि मुलगी शिक्षणासाठी दूर गेल्यावर आलेले एकटेपण. साथीला तब्ब्येतीच्या तक्रारी . पॆशाचा problem नसला तरी कोणीही depression ची शिकार होऊ शकली असती. सामान्यपणे इतर जणी मानसिक आजारी पडल्या असत्या पण तृप्ति नाही. तिने तिचे नाव सार्थ करायचे ठरवले.

आज तृप्तिकडे वेळच नाही . तिचे सर्व वेळापत्रक भरलेले आहे. आज तिने संपूर्ण पणे समाज कार्याला वाहून घेतले आहे. आपण केवळ अभ्यासात खूप हुशार असलो तर शाळेत नाव होते पण जर अभ्यासात थोडेसे कमी मार्क्स मिळाले तरी जीवनात सर्वात  जास्त मार्क्स कसे मिळवावेत हे तिने दाखवून दिले आहे.

कर्करोग पिडितांना महिकारी पद्धतीने true light therapy देणे असो वा नुसते मी तुमच्या बरोबर आहे हे दाखवून मानसिक स्थॆर्य देणे हे खूप महत्त्वाचे काम ती स्वतः हून निःशुल्क करते आहे. मुख्य म्हणजे हे सर्वच ती स्वतः हून patients ना जरूर असेल तोपर्यत कुठच्याही ऋतूत स्वखर्चाने करते.

दृष्टीहिन लोकांसाठी पुस्तकं वाचून रेकॉर्ड करणे असेल किंवा त्याना मदत करायला वेळ देण असेल हिचा कायम हसरा चेहरा. त्याना अजून मदत करता यावी म्हणून हि ब्रेल लिपी शिकत्ये हल्ली. मूक, बधीर मुलांना त्यांच्या शाळेत शिकवण्याचे कामही आहेच. गाणी गाणे हा छंदही जोपासलाय असाच.

एवढे सगळे करायला वेळ काढणे हि तीची कलाच आहे.

आपल्या आयुष्यात कितीही problem असले तरी इतरांना सुखी करताना जे समाधान मिळते त्याने खरी तृप्ति मिळते.

अशी आमची हसरी तृप्ति सर्वाना आदर्श ठरावी यात नवल नाही.

तुमचे काय मत आहे?

श्रध्दा….अंध कि अनुभवसिध्द?

हा विषय तसा खुप क्लिष्ठ आहे. माझ्यामते माणूस निसर्गतःच  श्रध्दाळु असतो तसाच वस्तुनिष्ठ सुद्धा असतो. कोणीही पूर्ण सश्रध्द किंवा फक्त वस्तुनिष्ठ नसतो. प्रत्येकाने त्याची एक पातळी ठरविलेली असते आणि तो त्यात सुखी असतो. माझी प्रत्येक गोष्ट संपूर्ण तर्कसंगत असेलच असे नाही पण म्हणून मी वहावत पण जात नाही.

मी सर्व बाबतीत logically वागण्याचा प्रयत्न करतो. केवळ हे असच करायचं असत म्हणून कुठचीही गोष्ट करत नाही. मला पटत नसेल तर वाद घालतो आणि पटल तर कोणी काय म्हणेल याचा विचार करत नाही .

मी स्वतः कधी कुठच्या बाबा, महाराजांना वाहून घेतले नाही पण दर वर्षी श्रावणात सत्यनारायणाची पूजा घरी घालतो.  मनाला बर वाटते.  पूजेनंतर वाचली जाणारी कथा कालबाह्य असली तरी पूजेचा हिस्सा  म्हणून ऎकतो. पूजा करून मला इश्वराच्या जवळ गेल्यासारखे वाटते. आपल्यापेक्षा खूप मोठी शक्ती आपल्या कडून आयुष्यात काहीतरी चांगले कार्य करून घेईल असा विश्वास वाटतो. पूजा करण्यास हे एवढे कारण मला पुरेसे आहे. परत आपल्याकडे  चार लोक येतात, जेवायला मेहुण वगैरे….. आपले काहीतरी ईप्सित साध्य होईल म्हणून नाही पण संस्कृती म्हणून पूजा करणे मी चालू ठेवीनच. आजकाल आपण कसे हुशार, पुरोगामी आहोत आणि म्हणून सगळ्या पूर्वीच्या गोष्टी मूर्खपणाच्या आहेत असे दाखविण्यात बरेच मश्गूल असतात. असो.

माझे काही मित्र मला हसतात. सत्यनारायण पूजा वगैरे सर्व चूक आहे म्हणतात. मी एकाला विचारले, तू देवळात जातोस ना? तो हो म्हणाला. मी त्याला सांगितलं तुला देवळात जाऊन जे मिळते तेच मला पूजा करून. काहीतरी चांगले करण्याची इच्छा.

असे असले तरी काही अंधश्रध्दा प्रत्येकाने जपलेल्या असतात. मी त्याना अनुभवसिद्ध श्रध्दा समजतो.

मी गाडी घेऊन मेट्रो च्या पुलाखालून जात असताना जर वरून त्याचवेळी मेट्रो गेली तर माझे काम नक्की होते असा माझा अनुभव आहे. हे पूर्ण हास्यास्पद आहे हे माहीत असूनसुद्धा मी सवयीने वरती मेट्रो जावी अशी आशा धरतो.

मी कायम पेपर मधले भविष्य वाचतो. ते वाचून करमणूक होतेच पण selectively चांगले भविष्य असेल कि थोडे बरे वाटते.हे खरे नाही असे व्यवस्थित माहीत असूनसुद्धा .

मी सामान्य माणूस आहे आणि अशा थोड्या निरूपद्रवी अंधश्रध्दा घेऊनच जगणार आहे.

आपल्या अशा काही अनुभवसिद्ध श्रध्दा आहेत का? आणि आपण त्या share करण्याची हिंमत दाखवू शकता का?

शब्देविण संवादु …..

संत ज्ञानेश्वरांनी रचलेले अभंग अजरामर आहेत. शब्दांशिवाय संवाद शक्य आहे एवढेच नव्हे तर अधिक परिणामकारक होऊ शकतो. संपूर्ण अभंगाचा अर्थ वेगळा आहे, मी फक्त एकच ओळ उद्धृत केली आहे. नवीन शास्त्राप्रमाणे सुध्दा संपूर्ण संवादात बोलले गेलेले शब्द खुप कमी आशय पोचवतात. बाकी सर्व आशय हा इतर द्रुकश्राव्य माध्यमातून पोचतो. खरे म्हटले तर शब्द बर्याच वेळा चुकीचा आशय पण पोचवतात.

शब्दांचा उगम झाला त्या आधीच संवाद होत होताच. सर्व प्राणीमात्र शब्दांशिवाय बोलताहेत. मानवी आयुष्यात प्रथम संवाद आई आणि मूल यांचा. त्यात कोणालाही शब्दांची गरज भासत नाही .

प्रेमात अखंड बुडालेले दोघे न बोलताही सर्व आशय पोचवून शकतात. साहित्यात मान्य असलेले सगळे रस , शृंगारासकट, शब्दांवर अवलंबून नाहीत.

संवादात भावना प्रमुख महत्त्वाची मानली म्हणजे शब्दाना गॊणत्व का हे कळत. एक हस्तांदोलन, एक आलिंगन खुप काही बोलून जाते. जिथे शब्दांची गरज भासत नाही तो संवाद उच्चतम.

आजच्या काळात आपण शब्दाना अवाजवी महत्त्व देतो आहोत म्हणूनच जास्त गॆरसमज पसरवत आहोत. मित्र केवळ whatsapp वर असले तर संवाद संपतो, केवळ शब्द उरतात.

अर्थात whatsapp पेक्षा फोन चांगला. पण काही वेळा खुप वेळ चालणाऱ्या फोन पेक्षा एखादा miss call बरच जास्त सांगून जातो.

आज तुम्ही कोणाला miss call देणार का?

मिजो.

Taking for granted.

दोन आठवड्यापुर्वीची गोष्ट आहे. रविवार होता. खुप कामे आखली होती. एकापाठोपाठ एक कामे करत होतो. दुपारी एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी पण valet होता. कार्यक्रम छान झाला. संध्याकाळी बाहेर पडलो. Valet ला कुपन दिले. पुढचे कार्यक्रम गाठायची घाई होती. बराच वेळ गाडी आली नाही. खुप शंका येऊ लागल्या. आता ते कुपनसुध्दा दिले होते. माझ्या हातात काहीच पुरावा नव्हता. कोण कुठचा valet थोडी भिती वाटली. आता गाडी देऊन ३ तास झाले होते. उपाय नव्हता. वाट बघत होतो. काही वेळाने एक माणूस आला. माझी गाडी सुरू होत नाही वगैरे. ..

गाडी जवळ आलो त्याच्या बरोबर . गाडी पूर्ण बंद. साधे ignition लाईट पण नाहीत. कळले बॅटरी चा issue.

एक तर रविवार, त्यात पाऊस, गाडी पाहिजे तेव्हा बंद असली कि काय हाल होतात ते अनुभवले. तिकडे बायको नामक सर्वज्ञ यात माझीच कशी चूक वगैरे…

थोडक्यात मला रविवार चांगलाच भोवला.

परत मेकॅनिक वगैरे …

आपल्याकडे एक बरे असते. रस्त्यावर सुद्धा सर्वज्ञ भेटतात. अर्थात एक कळले कि गाडी चे लाईट चालूच होते म्हणे. म्हणजे त्या valet च्या निष्काळजीपणा मुळे माझी बॅटरी drain झाली असावी.

एक विचार आला. आपण अशा कितीतरी गोष्टी ग्रूहित धरतो.एखादी गोष्ट जेव्हा अशी वागते तेव्हा आपण तिच्यावर किती अवलंबून होतो ते कळते .

यादीच आली डोळ्यांसमोर .

वस्तूंचे ठीक आहे. बदलता येते. नात्यांचे काय? एखादी relationship अकल्पित रीतीने बंद पडली तर? याचे mechanic पण मिळत नाहीत.

शेवटी taking for granted मध्ये सर्वात न कळणारी गोष्ट म्हणजे आपल शरीर. ते आपण 100% granted धरतो कि नाही?