आपल्या लाडक्या प्रशांतला त्याच्या साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझा हसरा चेहरा कायम प्रफुल्लित राहो.
काही आई वडील द्रष्टे असतात. मूल जन्मल्यावर ते मोठेपणी कसे असेल, वागेल हे कळणे तसे कठीण, पण यांना ते बरोबर जमते. आता आमच्या प्रशांत चे उदाहरण बघा. आजूबाजूला कितीही गोंधळ चालू असला तरी हा (प्र )”शांत “असतो. प्रशांत महासागरा सारखा. आत काही असेल, बाहेर काही असेल तरी हा खोल आणि शांत. आता कधीतरी काही वेळा खवळत असेल पण ते त्या नयनालाच ठाऊक. प्रशांत महासागर जसे देश जोडतो तशी हा वेगवेगळी माणसे जोडतो.
प्रशांत आणि माझी भेट IIT मध्ये झाली. अमिताभ बच्चन आनंद सिनेमात दिसायचा ना तसाच उंच, खूप बारीक आणि मराठीपेक्षा हिंदी जास्त बोलणारा. तसाच अबोल पण थोड्याच दिवसात तो रुळला. हसू लागला, कानपुर चा असूनसुद्धा मराठीत बोलू लागला. त्याचे त्याच्यासारखेच लांब नाव आम्ही छोटे सुटसुटीत केले. PM. कोणाच्याही रूममध्ये आला कि हा पहिला बेडवर आडवाच व्हायचा. एकदम आपला माणूस. IIT मध्ये केस विंचरण्यावर बंदी होती बहुतेक. कंगवा ही वस्तू कुठेच नसायची. प्रशांत चा मात्र हाताच्या बोटांनी केसांना वळण देण्याचा दंडक होता. कंगवा कशाला लागतोय? त्याची लेंगा झब्या ची सवय IIT ला वेगळी वाटायची. आम्ही सारे बहुतेक हाफ पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये. लेंग्याची नाडी पण unique, साधारण किलोमीटर लांब. सकाळी उठल्यावर हा जोरात नाक शिंकरणार. साधारण ब्रेकफास्ट बंद व्हायच्या अगोदर दोन मिनिट. उगाच साडे आठ चे lecture आहे म्हणून लवकर उठायचा पराक्रम त्याला जमलाच नाही. जसा जमला तसा आणि जेवढा पुरला तेवढा अभ्यास करून हा मनस्वी aeronautical engineer झाला पण काम civil चे करतोय. सुहास आणि त्याची जोडी एकदम complementary आहे म्हणून तर इतकी वर्ष टिकली. मी त्याला एकदा विचारलं तू सिविलच्या कम्पनी त काम कस करतोस ते न शिकता? तो म्हणाला अरे सुहासचा सपोर्ट आहेच आणि काम करायला civil शिकलेले बरेच आहेत कम्पनी मध्ये, पण ह्या लाईन मध्ये बाहेर uncivilised लोकच जास्त भेटतात, मी त्यांच्याशी deal करतो. मी गप्पच. त्याच सर्वात मोठं स्किल म्हणजे कोणाशीही त्याच्या भाषेत आणि त्याच्या आवडीच्या विषयात गप्पा मारू शकणे. का नाही आवडणार सर्वाना?
प्रशांत हा एक quick learner आहे आणि एखाद्या गोष्टीत काय धरायचं आणि काय सोडून द्यायचे हे त्याला लगेच कळत.एकदा त्याच्या बरोबर एका नवीन “साहेबाला” भेटायला गेलो होतो. “साहेब “खूप काही आणि जोरात बोलत होता. हा शांत. बाहेर आल्यावर म्हणाला “हाच मला सगळ्यात मोठी कामे देणार बघ “. रात्री आमच्या बरोबर “साहेब ” डिनर ला आला आणि प्रशांतची भविष्यवाणी खरी ठरली. अर्थात प्रशांत नुसतं एवढंच करत नाही. सध्या त्याच नवीन स्किल म्हणजे arbitration मध्ये आपल्या बाजूने निकाल आणणे. असो.
बाकी लोक कधी कधी शाकाहारी किंवा मांसाहारी असतात. हा strictly nonveg आहे. पेयाच्या बाबतीत एकदम चोखंदळ. यात PHD नक्की झालीये त्याची. काही बाबतीत मात्र त्याच्या आवडी एकदम फिक्स आहेत उदाहरणार्थ बिपाशा.
असा हा अजातशत्रू प्रेमळ प्रशांत साठ वर्षाचा होतोय हे खरंच वाटत नाही. कुठच्याही क्षणी हा “खूष है जमाना आज पेहली तारीख है”अस गाऊन एका हातात ग्लास उंचावून कोणालाही नाचवू शकतो.
प्रशांत, असाच आनंदी रहा आणि जवळच्या सर्वाना आनंदी करत रहा. आम्हा सर्व मित्रांचा तुला मनाचा आणि मानाचा मुजरा.
माझा रागसंगीतावरचा हा सातवा आणि शेवटचा ब्लॉग. मी हे शिवधनुष्य उचलू शकलो कि नाही हे वाचकच सांगू शकतील. माझा प्रयत्न मनापासून आहे हे नक्की.
भैरवीवर येण्या अगोदर काही इतर राग.
पुरिया
हा मला अतिशय आवडणारा राग. संध्याकाळी धुंद मैफिल जमवावी तर हा राग उत्तम. यात पुरिया, पुरिया धनाश्री आणि पुरिया कल्याण असे प्रकार. मी मात्र सर्वांचा एकत्रित विचार करतो. थोडासा उदास, एकाकी, ईश्वराशी जवळीक साधू पहाणारा क्षण प्रत्येकाने अनुभवला असेलच. आत्मचिंतन करायला लावणारा हा माझ्या मते बरोबर पुरियाचा मूड. सूर्यास्ताच्या वेळी गायला जाणारा हा राग एक विलक्षण अनुभव देऊन जातो. बहुतेक त्याच्यात असणाऱ्या कोमल रिषभ ने हा मूड येतो.
एक गाणं जे माझ्यामते लक्षणगीत होऊ शकेल ते म्हणजे शांताबाईंचं, हृदयनाथांनी स्वरबद्ध केलेलं आशाताईंचं ” जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे “. गाण्यात सुरुवातीला जी जिवलगा अशी तान आहे तिथेच हे गाणे हृदयाला भिडतं, रुततं, आणि अक्षरशः ओरबाडतं. एकाकी, दमलेली ती, डोक्यावर जड ओझे घेऊन घर अजून दूर आहे म्हणून खिन्न अशी तिची अवस्था एकदम हृदयातून मनाला बोचते. थकलेल्या पावलाना माथ्यावर चे आधीपासून असलेले ओझे जड झालेले वाटते. कधी जाणवतं कि तो जिवलग म्हणजे ईश्वर आणि ती म्हणजे आपणच कि, आपल्याला एकदम पटत, हो अस वाटू शकत. आपण उगाचच डोक्यावर आणि डोक्यात घेतलेल्या ओझ्याकडे बघतो. गाण्यात एका ठिकाणी शब्द नाहीत, सरगम आहे, शांताबाईंचे शब्द कमी पडले म्हणून नाही तर शब्दांची जरूर नाही म्हणून. शब्दांची गरज संपते अशी भावनांची उत्कटता. कुठेही रसभंग होत नाही. हा touch खास हृदयनाथांचा. प्रत्येक वेळी या गाण्याचा वेगळा अर्थ लक्षात येतो. तज्ज्ञ या गाण्यात थोडा राग श्री गौरी डोकावतो म्हणतात. असेल. असो.
एक आणखी सुंदर राग विशेष गाणे म्हणजे सुमन कल्याणपुर यांनी गायलेलं, पाडगावकरांचे “शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलांपरी “. बरोबर पुरिया, थोडा आर्त मारवा सुद्धा दिसतो यात. कदाचित विस्मृतीत गेलेल्या ह्या गाण्यात आलेली जपून ठेवावी अशी बकुळीची फुले हल्ली कोणी जपून ठेवत नाही. पुढच्या पिढीला बकुळीची फुलेच ठिकशी माहित नाहीत त्यामुळे ती जपून का आणि कशी ठेवायची हे कसे कळणार?. हल्ली प्राजक्त आणि केतकी हे शब्दही totaly unknown. शब्दच माहित नसतील तर भावार्थ आणि प्रतीके काय कळणार कप्पाळ. असो. इतर सुंदर गाणी “सांज ये गोकुळी “आणि “हरवले ते गवसले का “असा प्रश्न विचारून आत्मचिंतन करायला लावणारी.
ख्याल गायकीत अतिशय लोकप्रिय राग पण हिंदी चित्रपटसंगीतात लक्षणीय गाणी नाहीत.
भीमसेनजींचा आवडता राग, प्रत्येक प्रकारात बंदिश आहेच. धनाश्री त “पायलिया झनकार मोरी “किंवा पुरियातलं “घडिये गिनत जात “ऐकायला रसिक जीवाचे कान करून येतात. माझ्या सर्वात आवडत्या चीजा विलंबित “आज सो बना ” आणि द्रुत मधील ” बहुत दिन बिते ” या पुरिया कल्याण मधील चीजा ह्या त्यांच्या सर्वोत्तम तीन मधील म्हणाव्या लागतील. प्रत्येक घराण्याचा गायक हा राग गातो पण माझ्यामते हा राग भीमसेनजींच्या “किराणा” घराणं पद्धतीत हा राग अतिशय खुलून येतो. पुरिया पुरे आता.
भैरवी
भक्तिरसात बुडून ब्रम्हानंदी टाळी लागणे अनुभवायचे असेल तर भैरवी ला पर्याय नाही. हा प्राचीन राग अतिशय प्रसिद्ध आणि सर्व क्षेत्रात लोकप्रिय. हा एक संपूर्ण राग आहे आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी गायला जातो. कुठच्याही मैफिलीची सांगता ही भैरवीनेच करावी असा संकेत आहे. एक पर्व संपून दुसरं नवीन युग प्रारंभ होण्याची दवंडी.
ख्याल गायकीत प्रत्येक गायक भैरवीत चार पाच चीजा बाळगून असतो. खास फर्माईश होणारी एखादी रचना गावीच लागावी हा रसिकांचा प्रेमळ हट्ट पुरवायला लागतोच. परवीन सुलताना यांना तर “भवानी दयानी ” ही भैरवी गायल्या शिवाय प्रेक्षक उठूच देत नाहीत. अर्थात ह्या चीजांना copyright नसल्यामुळे कोणीही कुठचीही गावी, बंधन नाही. भक्तीरस प्रधान असल्यामुळे अभंग प्रकारात विशेष लोकप्रिय.
सर्वात्मका सर्वेश्वरा, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. अभिषेकी बुआंचे शतशः आभार. डोळ्यासमोर साक्षात पांडुरंग उभा राहतो. माझे अतिशय लाडके गाणं मात्र किशोरी ताईचं “अवघा रंग एक झाला, रंगीं रंगला श्रीरंग “. डोळे मिटूनही नाचणारा विठ्ठल समोर हजर.
या भैरवीच्या अभंगांवरून आठवलं. माझ्या लहानपणी घराच्या जवळ असलेल्या दत्त मंदिरात गुरुवारी रात्री भजन असायचं. कोणीतरी गायचे, मी पेटी आणि मित्र तबला. सगळेच हौशी त्यामुळे चालून जायचे. कधी तरी मात्र लालजी देसाई, रामदास कामत, कारेकर प्रभृती यायच्या. त्यावेळी आमचा कस लागायचा. मी बहुतेक वेळा नुसताच “लेहरा ” किंवा “षड्ज ” धरून. आमच्या लहान वयामुळे असेल, ते किंवा गाभाऱ्यातले दत्त गुरु सुद्धा आमच्या चुका पदरात घालून सांभाळून पुढे जायचे. पण आम्हाला भारी वाटायचं. तबलजी मित्र खट्याळ होता. कोणी हौशी गायक उगाच गायकी दाखवायला लागला कि हा “सम ” दाखवायचाच नाही, हरकती घ्यायचा. गायक जमिनीवर. भैरवी अभंगाच्या या काही humorous आठवणी अजून जपून ठेवल्यात. त्या सोडल्यास भैरवी आवडण्याचे मोठे कारण म्हणजे भीमसेनजींची प्रत्येक चीज.
फुल गेंदवा न मारो, बाजूबंद खुलं खुलं जाये, जो भजे हरी को सदा, जगत जननी भवानी या लक्षणीय रचना. कुठलीही चीज गाताना भीमसेनजींचा अभिनिवेश बघण्यासारखा असतोच त्याच बरोबर त्यांना हा राग विशेष प्रिय असावा. त्यामुळे ह्या चीजा श्रवणीय तर आहेतच त्याचबरोबर प्रेक्षणीय पण होतात. मला त्यांची सर्वात आवडलेली भैरवीतली चीज म्हणजे “जमुना के तीर “. ही रचना विलक्षण आहे. या गाण्याने आपले सोडाच त्या यमुनेचे शरीर सुद्धा थरथरत असेल. मी एकदा असाच ऐकत बसलो असताना एक “सुगम फक्त” वाला मित्र आला होता. थोडा वेळाने मी मंत्रमुग्ध आणि त्याची चुळबुळ सुरु. मी विचारलं अरे एवढी काय घाई? तो म्हणाला “अरे एवढ्या वेळात यमुनेचे पाणी अलाहाबादला गंगेलापण मिळाले असेल, तुम्ही अजून तीरावरच “.मी म्हटले “अरे आम्ही चिंब भिजून पैलतीर कधीच गाठलाय, आता आणखी कुठेच जायचं नाहीये रे “.
असं असूनही माझं भीमसेन प्रेम आणि त्याच्याशी मैत्री या दोन्ही गोष्टी टिकून आहेत कारण संगीता पलीकडेही विश्व आहेच कि.
दोन लक्षणीय गझल आठवतात.
“आपकी याद आती रही रातभर ” खय्याम यांचे संगीत आणि गुलाम अली यांची “ये दिल ये पागल दिल मेरा,……. आवारगी “. दोन्ही सुंदर असूनही थोड्या विस्मृतीत.
हिंदी चित्रपट संगीतात या रागात सर्वात जास्त गाणी असावीत, अगदी यमन पेक्षा सुद्धा जास्त. काही गाणी उडत्या चालीची आहेत राग प्रकृतीच्या विपरीत “चाहे कोई मुझे जंगली कहे “, “मै चली मै चली “, “मेरे देश कि धरती “वगैरे. एक खूप गोड गाणे “किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया “.लताचा तरुण आवाज अप्रतिम. बाकी सर्व भक्ती, गंभीर, दुःखी मूड.
सैगल पासून सुरु केल तर त्यांचं प्रसिद्ध “बाबूल मोरा नैहर छुटो हि जाय “अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातलं. मग “ज्योत से ज्योत जगाते चलो “. लोकप्रिय म्हणता येतील अशी “चिंगारी कोई भडके “, “दिल आज शायर है “, “हमे तुमसे प्यार कितना ” अशी बरीच.
या सर्वाबरोबर एक नाव असे आहे ज्याने भैरवीवर फक्त प्रेमच केल, त्याच्या प्रत्येक चित्रपटात एकाहून एक सरस गाणी दिली. लिजण्ड “राज कपूर “. राजनी एक सिरीयस आणि दुःखी नायक दिला. तो जिवंत करण्यासाठी भैरवी त थिम songs दिली सगळ्या चित्रपटात. काही गाणी बघा.
“आवारा हूं “, “बरसात मे हमसे मिले तुम “, “छलिया मेरा नाम “, “दोस्त दोस्त ना रहा “, “होटोपे सच्चाई होती है “, “केहता है जोकर “, “मेरा जुता है जपानी “, “मेरा नाम राजू “, “प्यार हुआ इकरार हुआ “, “सब कुछ सिखा हमने ना सिखी होशियारी “, “रमय्या वस्तावैया “, “जिना यहाँ मरना यहाँ “, “बोल राधा बोल संगम होगा के नही “. वगैरे………
सगळी गाणी भैरवीवर आधारित. बहुतेक वेळा शंकर जयकिशन पण इतरही असतील तरी राज कपूर यांना जिंकण्याचा फॉर्मुला माहित होता. साधा भोळा चेहरा आणि भैरवीत गाणे म्हणजे हमखास यश. राज कपूर आणि शंकर जयकिशन यांनी गाणी अतिशय सुंदर बनवली. एकच राग असूनही एकसुरी होऊ न देता एक राज ची प्रतिमा निर्माण करण्यात यश आलं त्यांना. पण रागाचे महत्व नक्कीच आहे. आवारा हूं हे गाणे म्हणे पन्नास देशात भाषांतरित होऊन गायले जाते, सुरावट तीच ठेऊन. असो.
रंगुनी रागांत साऱ्या हि ब्लॉग सिरीज इथेच संपवतो. ही माझी मते तुम्ही ऐकून घेतलीत आणि प्रोत्साहन दिलेत म्हणून एवढी मजल मारू शकलो. सर्व वाचकांना धन्यवाद.
हा ब्लॉग लोकप्रिय रागांवर, पहाडी आणि यमन, अर्थात माझ्या मते. यानंतर शेवटचा ब्लॉग भैरवी आणि काही राहिलेल्या रागांवर लिहेन.
पहाडी
हा राग ख्याल गायकीत आवडीचा नाही. विशेष चीजा नाहीत पण instrumental मध्ये खूप लोकप्रिय. एखाद्या हिरवळीवर शेळ्या चरताहेत, बर्फाच्छादित डोंगर, निळे आकाश दिसताहेत, छोटा ओढा खळखळ करतो आहे, गार वारा असल्यामुळे ऊन्हात बसणे छान वाटते आहे आणि गाणे ऐकू यावे “नीला आसमान सो गया “. पाठोपाठ शिवकुमार शर्मांचे संतूर आणि हरिप्रसाद चौरासियांची बासरी. हाच तो पहाडीचा खराखुरा मूड. सिलसिला मधील हे गाणे या रागाचे लक्षणगीत मानायला हवे. अतिशय रोमँटिक, मृदू, प्रेमळ अशी असंख्य गाणी तुमच्या चरणी पेश करणारा हा राग बऱ्याच वेळा थोडी सुरांबाबत मोकळीक घेऊन, मिश्र अश्या अवतारात येतो आणि “मूड” बनवतो. वानगीदाखल थोडी गाणी.”वादिया मेरा दामन “, बहारो मेरा जीवन भी सवारो “, कभी कभी मेरे दिलमे “, ” करवटे बदलते रहे सारी रात हम “, “फुलोंके रंगसे दिलकी कलमसे “, “कोरा कागज था ये मन मेरा “. पूर्वीच्या काळी हिरो हिरोईन फार जवळ येत नसत (चित्रपटात ), त्यावेळी दोन फुले एकमेकांना चिकटतायत असे दाखवायचे. प्रेक्षक सुज्ञ होते आणि त्यांच्याकडे कल्पना शक्ती होती.अशावेळी हा राग असला कि घाणेरीची फुले सुद्धा चालायची. मूड महत्वाचा.
एक नितांतसुंदर गाणे सर्व मुलींना आपल्या प्रियकराने म्हणावेसे वाटायचे “चौदवी का चांद हो या आफताब हो “वहिदा रेहमान छान दिसल्ये.
“दो सितारोंका जमी पर है मिलन आजकी रात ” अशी प्रेमाची यशस्वी जीत किंवा , “जो वादा किया वो निभाना पडेगा “असा प्रेमळ हट्ट यात खुलतो.
काही sad, विरही गाणी आहेत पण थोडीच अपवाद म्हणून.
“लग जा गले” हे मदन मोहनचे cult song. हे गाणे आजही नीट गाता आले तर competition मध्ये पहिला नंबर नक्की. आणखी “रुलाके गया सपना मेरा”, ” रहे न रहे हम”, “तुम मुझे भूलभी जाओ” वगैरे. अर्थात ही सुद्धा अप्रतिम.
मराठी मध्ये थोडीच पण अतिशय सुंदर गाणी आहेत पहाडीत.
केशवा माधवा तूझ्या नामात रे गोडवा. रागामुळे गोडवा गाण्यात पण उतरतो लगेच. “लाजून हासणे अन हासून ते पहाणे ” हे गाणे कितीही वेळा ऐकलं तरी अजून इतक्या वर्षांनी आवडते, मूड आनंदी होतो.
एक विलक्षण गाणे आहे, ते माझ्या मित्राने (नितिन आखवे ) लिहिले म्हणून नाही पण एक अतिशय आशयगर्भ गाणे. मुलीच्या लग्नाच्या आधी तिच्या मनात येणाऱ्या तरल आनंदी, औत्सुख्य, लाज आणि रोमँटिक मूडचे यथार्थ दर्शन. नितिन मनस्वी आणि वेगळाच कवी होता. लवकर गेला बिचारा, थोडीच गाणी पण अस्सल 24 कॅरट सोने एकेक. श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं आणि आशाताई नी उंचीवर नेलेलं. ” फुलले रे क्षण माझे फुलले रे “. पहाडी च्या मूडचा न विसरता येणारा अविष्कार. नितिनची आठवण कायम ठेवणारी ती “शकुनाची मेंदी”. असो.
गझल या प्रकारात बहुतेक वेळा प्रेमभंगच झालेला असतो शायरचा. पण काही रोमँटिक गझला गुलाम अली यांनी अजरामर केल्या, अर्थात राग पहाडी. शायर म्हणतो कि त्याच दिल नाजुक आणि चोट नयी है अभी पण “दिलमे एक लेहेर सी उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी ” अश्या मूडला पहाडी राग चपखल, मैफिल आनंदी होते. असो.
यमन
सगळ्यात लोकप्रिय राग म्हणजे यमन. हा आणि कल्याण एकत्र धरले जातात. तज्ञ मंडळी दोन्ही मध्यम यमन कल्याण आणि फक्त तीव्र मध्यम यमन असा फरक दाखवतात पण सामान्य पणे हा राग मी तरी एकच मानतो. या रागात असंख्य चीजा आहेत तशीच सर्वात जास्त गाणी याच रागात. Competition मध्ये राग ओळखा आले कि यमन ठोकून द्यायचा, पन्नास टक्के वेळा उत्तर बरोबर. आनंदी, खेळकर, रोमँटिक बरोबर थोडी सुख दुःखाची आंबट गोड चव देणारा हा हापूस चा आंबा म्हणजे यमन, एक कर्णमधुर राग. हा संध्याकाळी गातात.
ख्याल गायकीत भीमसेनजींचे “एरी आली पियाबिन ” किंवा “शाम बजाये आज मुरलीया ” किंवा ” पियाकी नजरिया जादू भरी ” ऐकलं नाही असा रसिक पार्ल्यात अथवा पुण्यात शोधून मिळणार नाही. संगीत शिकताना ह्याच रागाने सुरुवात करतात बहुतेक वेळा. विद्यार्थी खूष असतो कारण त्याला “जब दीप जले आना” गाता येत असं त्याला वाटत आणि आता सर्व सोपं आहे असं मनोमन पटत. पण हा राग गायला जितका सोपा वाटतो तेवढा सोपा नाही हे प्रयत्न केल्यावर कळत. प्रथम “पलटे” करताना तीव्र मध्यम नीट लागत नाही, लागलाच तर पुढचा प्रॉब्लेम आडवा येतो. “पियाकी नजरिया” किंवा “एरी आली पियाबिन ” ह्या बंदिशी त्रितालाच्या पहिल्या मात्रेवर नाही तर नवव्या मात्रेवर उचलायच्या असतात अश्या अनेक गोष्टी हळू हळू कळतात आणि विद्यार्थी जमिनीवर येतो. जे विद्यार्थी या पायरी च्या वर जातात तेच टिकतात. मग हळू हळू धीर धरायला शिकून “मन रे तू काहे ना धीर धरे ” सुरात गाऊ लागतात.
बहुतेक सर्व प्रतिथयश कलाकारांनी यमन हा आपलासा केला आहे कारण हा राग खूप सरळ, गोड आणि लोकप्रिय मानला जातो. प्रेक्षक ही ” यमन” नाव ऐकल्यावर टाळ्या वाजवतात गाणं सुरु व्हायच्या अगोदर. गायन आणि वादन दोन्ही प्रकारात हा पहिला.
मराठी मध्ये या रागावर असंख्य सुंदर गाणी आहेत. यमन ऐकताना आपण एका सुखी, समाधानी मूड मध्ये सहज येतो आणि मनात हे गुणगुणतो, “जीवनात ही घडी अशीच राहू दे “. हेच या रागाचे लक्षणगीत. हा मूड बरोबर यमन दाखवतो. अरुण दाते यांचे “शुक्रतारा मंद वारा ” किंवा बाबूजींचे “धुंदी कळ्यांना “, “तोच चंद्रमा नभात “परफेक्ट यमन. मंगेशकर घराणे यमन चे भक्त च. “तिन्हीसांजा सखे मिळाल्या “, “का रे दुरावा “, तुज मागतो मी आता “. सगळ्यात त्यांना आवडलेलं शांता शेळकेंचं “मागे उभा मंगेश “. गोवेकर आणि मंगेशकर असल्याने हे गाणं त्यांच्या हृदयात आणि रसिकांच्या मनात कोरलंय.
सर्व हिंदी संगीतकार या रागात एकतरी गाणं करतातच. सगळी गाणी लिहिणे शक्य नाही.
काही गाणी कितीही वर्ष झाली तरी आवडतात. “चंदन सा बदन “, ह्यात नूतन बरोबर हिरो कोण होता हे सांगितलंत तर तुम्हारे चरण स्पर्श तो बनताही है. पण गाणं आठवतं आणि ओठांवर येत.
जिंदगी भर नहीं भुलेगी वो बरसात कि रात, जब दीप जले आना, जीवनडोर तुम्हीसंग बांधी, वोह जब याद आये, वोह श्याम कुछ अजीब थी, मौसम है आशिकाना ह्या गाण्यांची गोडी रागामुळे निश्चित. गायक, संगीत कार, नट कसलेही परिमाण न लावता निखळ लोकप्रिय.
देव आनंद हा त्याच्या पहिल्या सत्रात अतिशय रोमँटिक आणि देखणा. त्याला असं यमन मध्ये गाणं मिळालं कि त्याच cult song सहज होत. “अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही “. यमन ऐकणाऱ्यांना हे असच चालू रहावं असं वाटणं अगदी स्वाभाविकच आहे. कोणाचही दिल कधीच न भरणारा मूड तयार करणे हाच तर ह्या रागाचा महिमा.
आता मेहंदी हसन. हा माणूस विलक्षण आहे. शायरी निवडण्यात एकदम निपुण आणि त्या शब्द हिऱ्यांना रागाच्या अचूक कोंदणात बसवणे यांच्याइतके कोणालाच जमत नाही. आज इतकी वर्ष होऊन सुद्धा ही गझल यमन ची प्रातिनिधिक पताका मानली जाते. “रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लीये आ “. “आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ “.
कल्याण थाटाच्या या यमन ने रसिकांचे खरोखरीच कल्याण केले आहे यात शंका नाही.
माझी तोडी या रागाची ओळख लहानपणीच आपल्या लाडक्या पु ल देशपांड्यांमुळे झाली. त्या काळी दूरदर्शन वर त्यांचा एक पेटी वादनाचा कार्यक्रम झाला. पु ल इतका हरहुन्नरी माणूस दुसरा कोणी नसेल. त्यांनी एक सुंदर सुरावट पेटीवर वाजवली आणि सांगितलं हा राग तोडी. तेव्हापासून त्या द्रुत तोडीचे सूर जे कानात घट्ट बसले ते कायम. घरी आई पेटीवर काही वाजवायची तेव्हा मी खेळायला पळायचो पण पुल ऐकल्यावर पेटी वाजवावी असं वाटलं. त्याकाळी मला दोनच गोष्टी यायच्या. एक जन गण मन आणि खूप प्रयासाने ही सुरावट.
माझं बालपण बर गेलं. त्याकाळी वडील उगाच कोणी आलं तर पेटी वाजवून दाखव असं सांगत नसत किंवा मी ही सुरावट वाजवताना कोणी काका आले तर ते आगाऊपणे “ह्या तोडी आणि भैरवीत काय फरक आहे सांग “असं विचारत नसत. मुलाला दोन तास मोकळा वेळ आहे म्हणून keyboards ची शिकवणी लावणाऱ्या आया अजून जन्माला आल्या नव्हत्या. माझा प्रॉब्लेम वेगळाच होता. ती सुरावट डोक्यात होती पण शब्द माहित नव्हते. पेटीवर वाजवताना एकदा सुरु झालं कि यायचं पण सुरुवात कुठच्या पट्टीने करायची ते विसरायला व्हायचं. एकदा माझी ही झटापट बघून आई ने मला सांगितलं अरे सुरुवात कुठेही करून तीच सुरावट वाजवता येते फक्त पट्टी बदलते. सोदाहरण. माझ्या आयुष्यात eureka चा क्षण म्हणतात तो हाच. ती पुढे म्हणाली “अरे साथ करताना मात्र गायकाच्या पट्टीत वाजवता आले पाहिजे “. पुढचे वाक्य तर कायम मनावर कोरले गेले. “आपण गाताना आपली पट्टी कळणं महत्वाचं “. पुढे आयुष्यभर कधी कशातही बेसूर होतोय असं वाटलं कि मी सरळ आपल्या पट्टीत परत येतो. असो.
मोठं झाल्यावर कळलं कि ती सुरावट ही खरी एक चीझ होती पुढे थोडा रस निर्माण झाल्यावर ते भीमसेनजींचे “लंगर कांकरिया जिन मारो ” द्रुत आवडून गेलं. सुरांना शब्द मिळाले. विलंबित “चंगे नैनोवालिया “आणि द्रुत “भवानी जगत जननी “मनात घुमू लागले आणि हा राग जगात भारी असल्याची खात्रीच पटली. मग इतरही चीजा ऐकण्यात आल्या. “एरी माई आज शुभमंगल गाओ “ऐकून अनेक सकाळी शुचिर्भूत झाल्या. या रागात जेवढे भांडार अभिजात संगीतात आहे तेवढं चित्रपटात नाही. प्रत्येक प्रतिथयश गायकाने या रागात गाऊन स्वतःचे स्थान अधिक उंच नेलंय.
तोडी हा एक भक्ती रस पूर्ण संपूर्ण राग आहे, तो ईश्वराच्या चरणी सकाळी गायला जातो. एकदा “पुण्य पर उपकार पाप हे परपीडा “ऐकाच. तोडी रागांगाचे चे खूप प्रकार आहेत. त्यात जास्त लोकप्रिय मियाँकी तोडी. इतर प्रकार म्हणजे अबीरी तोडी, गुजरी तोडी, बिलासखानी तोडी, देसी तोडी, हुसेनी तोडी आसावरी तोडी (कोमल रिषभ आसावरी ), आणि बहादुरी तोडी.
एकदा किशोरी ताईंचे विलंबित “मेरे मन याहू ” आणि मग द्रुत “बेगुन गुन गाये ” हेडफोन लावून ऐका, शास्त्रीय संगीत आवडत नसले तरी हा अनुभव जन्मात विसरणार नाही याची खात्री देतो.
हा राग आपल्या संस्कृती चे सुंदर उदाहरणं आहे. एक प्रसिद्ध चीझ आहे, राशिद खानांची विलंबित “अब मोरे राम ” ऐकून आपण तृप्त होतोय तेवढ्यात द्रुत मध्ये “अब मोरी नैय्या पार करोगे हजरत निजामुद्दीन ” अशी आळवणी. सर्व धर्म समभावाचे इतके चपखल उदाहरण मी पाहिलेले नाही.
मंगेशकर घराण्याचे या रागावर प्रेम. चित्रपटात विशेष न वापरला गेला म्हणून असंख्य संतवाणी गाण्यात दिसतो.
अगा करुणाकरा
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
नंद नंदन दिट पडिया माये सावरो सावरो
हृदय नाथ मंगेशकर यांच्या लेकिन चित्रपटात या रागांगातील दोन गाणी आहेत. जाणकारांना अजून लक्षात असतील. बिलासखानी तोडीतील “झुठे नैना बोले साची बतियां ” आणि गुजरी तोडीतील ” जा जा रे जारे पथिकवा “.आशा भोसलेनी गायलेलं गुलझार, RD, यांचे “भीनी भिनी भोर आई ” हे याच रागातले.
अर्थात सगळ्यात लोकप्रिय गाणे मात्र RD बर्मन यांनी दिलेले अमर प्रेम मधील “रैना बीती जाये “.
अभिजात संगीतात रुची असणाऱ्यांना तोडीस तोड कोणीच नाही असं नक्की वाटते पण चित्रपट संगीतात लोकप्रिय नसल्याने कदाचित लोकांना त्याचे एवढे महत्व वाटतं नसावं. असो.
पीलू
नावाप्रमांणे एकदम आवडून गेलेला राग म्हणजे पीलू. गोड पिलू जसं आपल्याला आवडते तसाच हा राग. अभिजात संगीतात थोडा सोपा समजला जातो बहुतेक. फार बंदिशी लोकप्रिय नाहीत पण ठुमरी मात्र खूप आहेत. काफी थाटातला अतिशय गोड राग.
चित्रपट संगीतात अत्यंत लोकप्रिय. मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये सुद्धा प्रसिद्ध. एक खट्याळ, प्रेमळ, नैसर्गिक खेळकर असा मूड सहज तयार करणारा राग. पूर्वीपासून खूप लोकप्रिय गाणी यात आहेत.
“धुंडो धुंडो रे साजना मोरे कान का बाला”, गंगा जमुना “कभी आर कभी पार लागा तीरे नजर”, “काली घटा छाये मोरा जिया तरसाये”.”जाईये आप कहा जायेंगे”, “ना जाओ सैया छुडाके बैया” सर्वच गाणी अप्रतिम.
अगदी रोमँटिक “चुरा लिया है तुमने जो दिलको “सुद्धा त्यातलंच.
अभिमान मध्ये सर्वच गाणी सुंदर होती. त्यातलं पहिलं जया भादुरी वर चित्रित “नदिया किनारे हेरायी आई कंगना “एक फ्रेश मूड आणते. गोड, खेळकर, सुमधुर आणि सतगुणी मुलीच introduction या गाण्याने पटकन होत.
मराठी सिनेमात जगण्याचे ज्ञान द्यायला हाच राग. “अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर “. आपण नकळत असलेल्या परिस्थितीत आनंदी रहाणारी माणसं स्वतः होऊन जगतो.
मला खात्री आहे कि श्रीकृष्णा वर सगळ्यात जास्त गाणी, रचना असाव्यात. त्याच कशाचंही कौतुकच झालं. बऱ्याच लोकांना त्याचा हेवा नक्की वाटत असेल. म्हणजे गोपी नाहताना त्यानी गोपींचे कपडे पळवायचे आणि गोपींनी विनवण्या करायच्या. “दे रे कान्हा चोळी लुगडी “. आता कान्हा काही कपडे देत नाही आणि गोपी पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाहीत, हा तिढा सोडवायचा तरी कसा? पुढे काय झाले असेल यावर असंख्य मते आणि काव्यं आहेत. असो. पिंजरा चित्रपटातील हे या रागातील गाणे अजून नक्की लक्षात असेल.
भारत भूषण या न नटाला समोर मधुबाला असताना असा प्रश्न कसा काय पडतो कोण जाणे. चित्रपट बरसातकी रात, राग पीलू “मैने शायद तुम्हे पेहले भी कंही देखा है” एकदा मधुबालाला ओझरतं सुद्धा बघितल्यावर तिला विसरणं शक्य आहे का? असो.
एका गाण्याचं साधारणपणे मला अजीर्ण झालंय आता. बलराज सहानी चे “ओ मेरी जोहराजबी, तुम्हे मालूम नही “. कुठेही थोडं मॅच्युअर्ड प्रेम दाखवायचं कि दुसरं गाणंच दिसत नही लोकांना. पन्नास वर्ष तेच गाणे. असेल ते पीलू मध्ये पण किती अतिरेक तो.
एखादे दुःखी गाणेसुद्धा आहे या रागात. ” बहारोने मेरा चमन लुटकर “. पण exception. काही काही अतिशय intense गाणी आहेत. “सूर ना सजे क्या गाऊ मै “.
एक फार सुंदर गाणे इलायराजा च्या संगीत दिग्दर्शन मध्ये. सदमा मधील “सुरमई अखियोंमे नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे “. खेळकर, छान लोरी च्या सुरावटीत डोळ्यात पाणी आणणारे एकमेव गाणे.
हा ब्लॉग इथेच थांबवतो. अजून पहाडी, यमन आणि भैरवी बाकीच आहेत. यावेळी गाण्यांच्या ऐवजी कानात आणि मनात घर केलेली ती पेटीवरची तोडी ची सुरावट पाठवत आहे. बघा जमल्ये का.
आधी लिहिल्याप्रमाणे मी मला आवडेल अशी राग ओळख करून देणार आहे. तोडी, यमन, भैरवी साठी संपूर्ण ब्लॉग्स लागतील. त्याआधी काही थोडे.
मारू बिहाग
काही काही रागांची ओळख ही काही विशिष्ठ कारणानी होते.त्यातलाच हा मारू बिहाग. आम्ही शाळेत होतो. त्यावेळी जरी मुली वर्गात असल्या तरी त्यांच्याशी बोलणे हा फाऊल मानला जायचा. वर खाली जायचे जिनेसुद्धा वेगळे असायचे. अर्थात नंतर सुद्धा IIT इंजिनीरिंग हा तसा वाळवंटी प्रदेशच. असो.
नुकतीच मिसरूड फुटायला लागली होती आणि अजून adult मुव्हीला officially एन्ट्री नव्हती. त्या काळी प्रभा अत्रे क्लासिकल म्युझिक मध्ये फेमस झाल्या. त्यांचा मारुबिहाग, कलावती वगैरे चा अल्बम लोकप्रिय झाला. त्यातली ती चीझ “जागू मै सारी रैना बलमा” ही विशेष श्राव्य. आम्हाला लहानपणी द्रुत जास्त आवडायचं. बडा ख्याल, विलंबित वगैरे प्रकरण जरा बोरिंग वाटायचं . गाणे आवडायला त्याकाळी काव्य अर्थपूर्ण असावं लागायचं. गाण्यात का होईना कोणीतरी आपल्यासाठी रात्रभर जागतंय ही फीलिंग खूपच लुभावनी. असही असत बुवा, मजा आहे अन काय. त्यात पुढे “बहुत रमायो सौतन घरमा “. इथे एखादी स्मितरेषा महाग तिथे साजन दुसरीकडे गेला म्हणून झुरणारी सुंदरी. तीन तालाचा सुंदर ठेका आणि सुटसुटीत छान काव्यं, एकंदरीतच हा “मारू “बिहाग आवडून गेला. द्रुत वरून मग मला हळू हळू विलंबित ख्याल गायकी थोडी आवडायला लागली. “कल नाही आये ” पासून गाणे लागले तरी बंद करावसं नाही वाटल. एकदा सहज त्याच्यावरून ” तुम तो प्यार हो सजना ” आठवलं. थोडं विचारल्यावर ते याच रागात आहे असं कळलं. भारी वाटलं. पुढील दोन दिवस दिसेल त्याला हे गाणे कुठच्या रागात आहे हे विचारत होतो. तो माहित नाही म्हणाला कि मी जोरात, अरे मारुबिहाग.
या गाण्याच्या चित्रीकरणात spectacular असं काहीही नाही माझ्यामते. हिरोईन संध्या हे एक कारण पुरेसे आहे पण बघा म्हणजे हिरो कोण माहित नाही. “सेहरा” चित्रपट सुमार , संगीत दिग्दर्शक रामलाल फारसे प्रसिद्ध नाहीत, वाळवंटात चित्रित केलंय. मला नृत्य या कलेत विशेष कळत नाही (कशात कळत हा पण एक प्रश्न आहे ), पण नाच म्हणून जे काही आहे ते…. जाऊदे. तरी गाणं अजून ओठांवर येत. केवळ मारू बिहाग लक्षण गीत म्हणून. इतर गाजलेली गाणी.
दिल जो ना केह सका, रफी अद्वितीय, रोशन यांचे संगीत
मतवाली नार ठुमक ठुमक चली जाये,
इथे वहिदा रेहमान छान नाचते आणि संजय दत्त ला नाचता का येत नाही हे त्याच्या वडिलांकडे बघून कळते.
मराठी संगीतकारांनी या रागावर फारशी पसंती दाखवली नाही. दोन अपवाद सोडल्यास.
“का धरिला परदेश” हे अभिषेकी बुवांनी संगीत दिलेले नाट्य गीत आणि एक यशवंत “देवांचे ” कवी अनिल यांचे “केळीचे सुकले बाग”. हे गाणे उषा मंगेशकर यांच्या आवाजात आहे. दोन दिग्गज बहिणी समोर असूनसुद्धा उषा ताईंना या गाण्यासाठी देवांनी का घेतले हे गाणे ऐकल्यावरच पटते. असो.
मारुबिहाग बस आता.
मालकंस
वरील “का धरिला परदेश” गाणे गायलंय बकुळ पंडित यांनी. त्यांचे नाव घेतले कि एक गाणे आठवतेच, “उगवला चंद्र पुनवेचा “. हे गाणे “मालकंस” रागावर आधारित आहे. मालकंस राग हा प्राचीन, सर्व रागांचा अधिपती मानला जातो. हा राग पार्वतीने शंकराच्या तांडवानंतर त्याला शांत करण्यासाठी निर्माण केला असे मानतात. खूप वेगळा, फार जवळ येऊ न देणारा अवघड राग. मैफिल गाजवायची असेल तर पुरिया आणि स्वतः साठी गायचे असेल तर मालकंस असे एका प्रतिथयश कलावंताचे म्हणणे आहे असं ऐकलंय. असो. मैफिल जेव्हा जाणकारांची असते तेव्हा नक्की गायला जातो. उगाच कोणीही यावे आणि गाणे करावे असा याचा स्वभाव नाही त्यामुळे संगीतकारही जरा बाचकूनच असतात. याच लक्षण गीत म्हणता येईल असे गाणे म्हणजे ” मन तडपत हरी दर्शन को आज “. काही काही गाणी रफीने अशी गाऊन ठेवली आहेत कि कोणालाही आपल्या गायनाचा गर्व झाला असे वाटले कि त्याला गायला सांगावीत. तो गर्विष्ठ गायक परत तुमच्याकडे येतच नाही. मालकंस रागाला लक्षण गीत या पेक्षा सुंदर आणि काही नकोच. काही काही लोकप्रिय गाणीही आहेत या रागात जसे “गोरी तेरा गाव बडा प्यारा “, “आखियनं संग अखिया लागे आज”.हे अपवादच. अर्थात या वाटेला विशेष कोणी जात नाहीत हे चाणाक्ष वाचक ओळखतीलच.
माझे सुद्धा इतकेच.
दरबारी कानडा
ह्या रागाची ओळख तशी थोडं मोठा झाल्यावर झाली. स्वतः वेगळे राहायला लागल्यावर एखादी उंची वाईनची बाटली घरी मित्राबरोबर उघडली आणि एखादी गुलाम अलिची गझल लावली कि जी मजा येते ना तशीच फीलिंग. त्यात ती “हंगामा है क्यूँ बरपा? थोडीसी जो पिली है” एकदम फेव्हरेट. ही गझल म्हणजे मनसोक्त जिण्याचे स्वातंत्र्य जणू . यात पिण्याला नसून जिण्याला महत्व जास्त. आधीच गुलाम अलींचा आवाज, असले काव्यं आणि तो मूड एकदम भारी. नंतर कळलं कि हा राग “दरबारी कानडा “. खूप आवड निर्माण झाली. माझ्यासाठी हेच या रागाचे लक्षणगीत.
असं म्हणतात कि हा कर्नाटकी राग तानसेन यांनी हिंदुस्थानी संगीतात आणला आणि त्याचे नामकरण केले. अतिशय गेय, नैसर्गिक गोड आणि सोपा असल्यामुळे खूप लोकप्रिय. या रागात खूप चीजा प्रसिद्ध आहेत पण चित्रपट सृष्टी ने याच्यावर खरेच खूप भरोसा टाकला आहे. प्रत्येक संगीतकार याचे एक निराळे रूप आपल्यासमोर आणतो. एकच राग त्याच्या असंख्य रूपात आपल्या समोर येतो, इतका कि संभ्रम व्हावा.
मदन मोहन हा स्वर्गीय अवलिया. त्याचे रफीच्या आवाजातील “मै निगाहे तेरे चेहरेसे हटाऊ कैसे?” आठवा. चित्रपट आपकी परछाईया. अत्यंत रोमँटिक. त्याच चित्रपटातील लता मंगेशकरांचे “अगर मुझसे मोहोब्बत है, मुझे सब अपने गम दे दो “याच रागातील. दोन्ही गाणी अप्रतिम, तलम रेशमी भावना.
याच बरोबर दुःख, विरह, प्रेमभंग वगैरे. पूर्वीच मुकेश यांचं “दिल जलता है तो जलने दे “. किंवा “चांदिकी दिवार ना तोडी प्यार भरा दिल तोड दिया “. किंवा रफीचं “गुजरे है आज इष्क में हम उस मकाम से ” आणि ” हम तुमसे जुदा होके “, “ओ दुनियाके रखवाले “एकदम दुःखी, विरही वगैरे.
या पेक्षा एकदम वेगळे “सत्यम शिवम सुंदरम “. त्यात झीनत जास्त लक्षात रहाते यात त्या रागाचा दोष नाही.
नाट्यसंगीतात छान वापरला गेला हा राग. “मृगनयना रसिक मोहिनी “, “रजनीनाथ हा नभी उगवला ” वगैरे.
एक गाणे मात्र माझ्या पूर्ण डोक्यात जाते. ते याच रागात आहे हे अजून पटत नाही. “देखा है पेहली बार साजन कि आंखो में प्यार “. या गाण्यानी त्या काळी खूप लोकांचा लोकलचा प्रवास दोन वर्ष टॉर्चर केला. मी गमतीने याला ठिक्कर गाणे म्हणत असे. दोन पत्र्या चे, किंवा तुटक्या काचां चे तुकडे घेऊन कोणीही भीक मागायला त्या काळी हेच गायचा /ची. गायला सोपे आणि लोकप्रिय असं combination होत ते.
अरे कुठे ते हंगामा है क्यूँ आणि कुठे हा तमाशा? असो.
या वेळी परत काही गाणी पाठवत आहे. अभिप्राय चांगला असल्यास कळवणे, उगाच तसदी घेऊ नये. पुढील रागांच्या ब्लॉगची वाट पहा.
अभिजात संगीतात कितीही घराणी असली तरी काही गोष्टींबाबत मतभेद नाहीत. भैरव राग हा प्रथम प्रहराचा, पहाटेच्या वेळी गायचा असतो आणि मैफिलीचा शेवट, समारोप भैरवीने व्हावा हा सर्वमान्य संकेत आहे. माझ्या रागविषयक ब्लॅागचे नाव बघून तुम्हाला कळले असेलच कि मी रागांविषयी बोलताना सर्वसमावेशक लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. एकेक रागाविषयी सविस्तर बोलणार आहे. मी रागांची क्रमवारी मला आवडेल अशी घेत आहे. या मालिकेतला शेवटचा ब्लॉग भैरवी वर लिहीन.
राग भैरव, अहीर भैरव,
हा एक खूप जुना आणि प्रचलित राग आहे. प्रात:काळी गायला जाणारा भक्तीरसाने परिपूर्ण असा राग. भैरवपेक्षा अहीर भैरव जास्त प्रसिद्ध आहे. याला दक्षिणेत चक्रवाक असे म्हणतात. कदाचित त्याच्या गोलाकार चलनामुळे असेल. कोमल रिषभ (रे ) हा या रागाचा महत्त्वाचा सूर आणि त्याची ओळख. हा सातही सूर असल्यामुळे संपूर्ण राग.
“अलबेला सजन आयो रे” ही चीज हे या रागाचे चपखल असे उदाहरण. संगीत दिग्दर्शकांनी या रागाकडे तसे दुर्लक्षच केले आहे. मला आवडलेले लक्षण गीत म्हणता येईल असे गाणे म्हणजे
“तीर्थ विठ्ठल श्रेत्र विठ्ठल.”
भीमसेनजींचा जोरदार आवाज आणि तो भजनी ठेका. या अभंगातल्या नामदेवाला जसा विठ्ठल “सापडला” तसाच हा अभंग ऎकणाऱ्या सर्वाना तो सहज सापडतो.
पूर्वी मराठी मन उचंबळून यायला दोन गोष्टी पुरेशा होत्या. एक तर बाळासाहेबांची दसरा सभेतील “जय महाराष्ट्र “अशी गर्जना आणि दुसरी भीमसेनांची ही विठ्ठलाची देवपूजा. सकाळी हे गाणे रेडियोवर ऎकल्यावर कोणीही सहज सश्रध्द वारकऱ्यासारखा मनात डोलू लागायचा. असेच आणखी एक गाणे म्हणजे अभिषेकी बुवांचे “हरी भजनाविण काल घालवू नको रे “.
या गाण्यांना तुफान लोकप्रियता लाभण्याचे महत्त्वाचे कारण हा अहीर भैरव राग आहे हे माझे ठाम मत आहे. गाण्याचा आशय आणि राग यांचा असा मिलाफ क्वचितच बघायला मिळतो.
हल्ली वाघांचे दात काढले गेलेत आणि भीमसेनजींच्या जवळपास जाणारे जन्माला आले नाहीत, त्यात रॅप वर अहीर भैरव जमत नसल्यामुळे एकूणच मराठी मने थंडगार आहेत.
काही जुन्या हिंदी संगीतकारानी हा राग खूप परिणामकारकरित्या वापरला. मन्ना डेंचे ” पूछो ना कैसे मैने रैन बिताई” हे गाणे आठवतयं? इथे सुद्धा रागाचे सूर, दिवसाची वेळ, गाण्याचा गाभा हे सर्व एकदम फिट बसत. गाणे सुपरहिट. अजूनही बरीच गाणी आहेत उदा. “अपने जीवन कि उल्झनको कैसे मै सुलझाऊ?”
या नंतर एका वेगळ्या रागाबद्दल, नाव ” गारा “.
हा राग मुख्य रागांपैकी नाही, तसा अनवट म्हणता येईल. पिलू, झिंझोटी, खमाज या रागांचे मिश्रण आहे. पण मिश्रण झालय मस्त. अभिजात संगीतात, ख्याल गायकीत विशेष गायला किंवा वाजवला जात नाही. विशेष बंदिशी नाहीत, पण हिंदी चित्रपट संगीतात लोकप्रिय होता. हा जयजयवंती रागाला जवळचा मानला जातो. रागाचे स्वरूप, राग पिलूची जवळीक वगैरे मुळे हा रात्रीचा असणार हे कोणीही सांगेल पण याचा मूड हा संगीत दिग्दर्शक ठरवेल तसा. जयदेव यांनी हा राग दुःखी, करूण रसात ओथंबून आणला. चॉकोलेट हिरो देव आनंद डबल रोल, आणि चित्रपट हम दोनो. ” कभी खुदपे कभी हालात पे रोना आया “. रफीचा दैवी आवाज आणि जयदेव यांचे संयत संगीत.अविस्मरणीय.
हाच राग सचिन देव बर्मन यांनी अगदी आनंदी, रोमँटिक केला. आणि गंम्मत म्हणजे हिरो तोच देव आनंद.
“ऐसे तो ना देखो के हमको नशा हो जाये ”
” तेरे मेरे सपने अब एक रंग है “.
दोन्ही गाणी अप्रतिम. देव आनंद असल्यावर नैसर्गिक रोमँटिक गाणी खुलून दिसतात. आता मजा अशी आहे कि राग एकच पण मूड एकदम वेगळे. बहुतेक मिश्र राग असल्यामुळे असा फरक करू शकतो आपण. प्रत्येक रागाच्या प्रमाणे भिन्न मूड एकाच रागात आणता येत असावेत.
त्या नंतरच्या काळातलं ” उनके खयाल आये तो ” हे एक परत दुःखी गाणे. राज कुमारने यात पहिल्या कडव्यात तबला वाजवला आहे (सिनेमात ). हा “जानी” तबला वाजवताना हे दुःखी गाणे विनोदी झालंय ते डायरेक्टर ला नंतर लक्षात येत बहुतेक म्हणून त्यानंतर तो एकटा बसून दारू पिताना दाखवलाय. असो.
एक आणखी अतिशय रोमँटिक याच रागातील गाणे म्हणजे नौशाद यांनी संगीत दिलेले ” मोहें पनघट पे नंदलाल छेड गयो रे ” मुघल ए आझम मधले राग गारा मधेच बांधले आहे. मधुबाला समोर असे गात असेल तर त्या दिलीपला आपण नंदलाल व्हावं का नाही वाटणार? तो सोडा थिएटर मधील बहुतेक सर्वाना आपणच कृष्ण झाल्यासारखे वाटायचं . हा नक्की गारा चा महिमा कि मधुबालाचा ह्यावर debate होईल.
नौशाद यांना रागदारी ची समज छान होती. मुघल ए आझम मधील एकमेव प्रणय दृश्यात त्यांनी राग सोहोनी वापरला तो ही बॅकग्राऊंड ला. बडे गुलाम अली खान यांच्या आवाजात ” प्रेम जोगन बनके “. दिलीप कुमार मधुबालाच्या चेहऱ्यावर एक पीस फिरवतोय असा सीन. हे पीस नंतर लिलावात विकले गेले म्हणतात. दोघे कसलेले कलाकार, तिचे दैवी सौंदर्य आणि पाठी सोहोनी रागातील बंदिश. शास्त्रीय संगीत न कळणारेसुद्धा मंत्रमुग्ध. परत या मध्ये अनेक मते. माझा एक मित्र, ” अरे बॅकग्राऊंड ला काहीही नसते तरी चालले असतें, किंवा “मुन्नी बदनाम हुई ” सुद्धा सुपरहिट झाले असतें. हा मित्र कोण ते चाणाक्ष वाचकांनी ओळखले नाही तरी चालेल. थोडक्यात काय अभिजात संगीताने कंटाळणारे सुद्धा बरेच असतात. त्यांना कुठचा राग ह्याचे काही देणे घेणे नसते. समोर चित्र हलली पाहिजेत हा criterion.
हा ब्लॉग लिहून झाल्यावर मी याच रागातली काही गाणी स्वतः गाऊन बरोबर पाठवायची ठरवले. ब्लॉग कसा झालाय हे जाणून घेण्यासाठी तो आधी आचार्यांच्या कूल दीपकला पाठवला. अपेक्षा अशी कि तो म्हणेल “लिहीत रहा, गात रहा “. पण काहीच उत्तर न आल्यामुळे विडिओ कॉल केला. तो म्हणाला ” ब्लॉग बरा आहे पण गाणी तूच का गायलास? म्हणजे असं बघ आम्हाला वाटल तर आम्ही original ऐकू ना? तू जरा ” पलटे ” कर नाहीतर हे “असं “होतं. ” यामध्ये त्याने हे “असं” म्हणताना जे केल ते बघून वरून डॉक्टर लागूच अवतरले आणि मला म्हणाले. “मला जर अशी acting जमली असती तर नटसम्राट आणखी उठावदार झाला असता रे.” असो.
तर मी नेहमीप्रमाणे त्याला विचारून आणि त्याचा सल्ला न मानून ब्लॉग आणि गाणी पाठवत आहे.
या ब्लॉगमध्ये इतकेच. पुढील ब्लॉगमध्ये इतर रागांबद्दल लिहीन. वाट पहा.
ह्या रागांची नावे कोण ठरवत असेल कोण जाणे? अर्थात “नावे ” ठेवण्यात काही कारण नसते तसेच नाव ठेवताना कुठच्या आत्याला विचारत असतील ही मंडळी? असो.
आज सुरवात भूप पासून.
भूप अथवा भूपाली.
ह्याच नाव ऐकलं कि मला धूप आठवतो. हा एक प्रसिद्ध राग, साधारण गंभीर प्रकृती चा, कल्याण थाटाचा, संध्याकाळी गायला जातो. शुभं करोति, परवचा म्हणताना धूप लावलाय आणि गाण “ओंकार प्रधान रूप गणेशाचे “. बस हाच तो क्षण, किंवा “अबीर गुलाल उधळीत रंग “, “देहाची तिजोरी ” ही पण चालतील. हा भूप. हा मनात धूप लावून संस्कारित करतच येतो. ही गाणी चांगली आहेतच पण माझ्या मते याच लक्षण गीत म्हणता येईल असे गाणे म्हणजे ” माझे माहेर पंढरी “. भीमसेनजींनी समस्त कानसेन आणि वारकरी समाजावर अनंत उपकार केले आहेत. एकदा हे गाणे ऐकलं कि आपली माऊली पंढरी हुन आपल्याला बोलावत आहे आणि आता जायलाच हवं असं त्या वारीत जाणाऱ्या तर सोडाच घरी बसणाऱ्या लोकांनाही वाटते. इतरही गायकांनी ही गाणे चांगले गायले आहे (बलवल्ली वगैरे ), पण भीमसेन यांच्या आवाजात एक दैवी जादू आहे आणि रागात जे भाव आहेत ते इतके सुंदर प्रकट होण्यासाठी खूप साधना लागत असावी. असो.
हा राग संध्याकाळी गावा असा संकेत असला तरी काही सकाळची गाणी छान वाटतात यात. ” प्रभाती सुर नभी रंगती “, ” उठी उठी गोपाळा “वगैरे . बर गोपाळ, यादव मंडळी पुण्याची नसल्यामुळे त्यांना संध्याकाळी उठवायला लागत नसावे, अर्थात सकाळचीच वेळ आहे. किंवा ” प्रिये पहा, रात्रीचा समय सरून येत उष:काल हा ” इथे संशयाला काहीच जागा नाही. अगदी रात्रीचं नक्की म्हणजे ” धुंद मधुमती रात रे “. थोडक्यात काय तर संगीतकारांनी हा राग कुठल्याही वेळेसाठी वापरला आहे.
आता मूड, इथेसुद्धा वैविध्य दिसते. भक्ती हा मुळ गाभा मानला तरी काही रोमँटिक गाणी आहेतच वरील प्रमाणे. एक अलिप्त पण आहे ” माझे जीवन गाणे “. व्यथा असो आनंद असुदे अशी स्तिथप्रज्ञ निर्गुण भूमिका.
हिंदी चित्रपटातील काही गाणी अतिशय प्रसिध्द आहेत. रोमँटिक ” देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए “. याच संगीत दिलय हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा या जोडीने. भूप हा तथाकथित गंभीर राग का बरं घेतला असेल त्यांनी? त्यांना या बाबतीत अधिकार आहेच त्यामुळे एक वेगळा प्रयत्न दिसतो. असो.
उमराव जान म्हटलं कि फक्त रेखा आठवते. खय्याम यांनी संगीत दिले होते हे बहुतेक लोकांना माहित नसते आणि त्यांना फरकही पडत नाही. त्यातले एक गाणे भूप रागाच्या प्रकृती च्या अगदी वेगळे. “इन आँखोंकी मस्तीके, मस्ताने हजारो है “. हे गाणे बघताना हा राग कुठला असा प्रश्न ज्याला पडत असेल “उसने पिही नही ” हेच खरे. भूप पुराण सुफळ संपूर्ण.
भीमपलास.
हा काफी थाटातील प्रेमळ आणि शांत रस निर्माण करणारा राग. नावातील भीम हा उगाच घाबरवतो. हा राग ऐकल्याने बेचैनी, anxiety कमी होते असे कोणीतरी सिद्ध केले आहे. हा औडव संपूर्ण असा राग. थोडक्यात वर जाताना पाच सुरात वर आणि खाली येताना सर्व सात सूर. प्राणायाम मध्ये श्वास घेताना जसा लवकर घेऊन आणि सोडताना सावकाश सोडला जातो तस काहीस. भजन प्रकारातील भीमसेनजींचा लक्षात राहिलेला अभंग “इंद्रायणी काठी ” या रागातील आणि समर्पक लक्षणगीत.
मराठी वातावरणात तत्वज्ञान सांगणारे वेगळे गाणे आले कि हा राग नक्की. “मधू मागशि माझ्या सख्या परी “किंवा “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख “. भावगीतामध्ये अपवादात्मक “तूझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे “यशवंत देवांचे. बाबूजी (सुधीर फडके ) गाणार म्हणजे शब्द आणि सूर स्पष्ट. गाण्यात श आणि ष चा वेगळा उच्चार करणारे एकमेव गायक. ते हयात असते तर मी हे भक्तीगीत असताना भावगीत का म्हटलंय अशी माझी उलट तपासणी झाली असती. असो.
हिंदी चित्रपटातील गाण्यात जुन्या संगीतकारांपासून ते नवीन पर्यंत सर्वांचा लाडका राग भीमपलास. लताचा आवाज एकदम suitable. “ये जिंदगी उसिकी है “, “कुछ दिलने कहा ” अजूनही लक्षात असतील. मदन मोहन ने एकच गाणे केले या रागात पण काय गाणं आहे , ” नैनोमे बदरा छाये ” मेरा साया चित्रपट. इतरही संगीतकार प्रयत्नशील होते. “ओ बेकरार दिल”. “खिलते है गूल यहाँ “वगैरे.
या रागावर खऱ्या अर्थाने प्रेम केले ते आधुनिक काळातील A.R. Rehman यांनी. त्यांनी प्रत्येक चित्रपटात एखादे गाणे केलेच यात.
” ए अजनबी तू भी कभी ”
“राधा कैसे नं जले ”
“तन्हा तन्हा यहापे जिना “.
प्रत्येक गाणे अगदी वेगळं आहे पण सुरावट आणि मींड भीमपलास खास. रहमान ची स्वाक्षरी प्रत्येक गाण्यात आहे पण आता तुम्ही पण गाऊन बघा, रागाची ओळख नक्की पटेल तुम्हाला.
आयुष्मान खुराणा हा काही मोठा गायक नाही पण या रागातील सोपे गाणे त्याला प्रसिद्धी देऊन गेले. “पाणी दा रंग “.
एका नायिकेचं करियर बदललं एका गाण्याने. रवीना टंडन ही रातोरात फेमस झाली कारण हे गाणे. ” तू चीझ बडी है मस्त मस्त “. नाच, चित्रीकरण सामान्य पण भीमपलास सरगम भाव खाऊन गेली. प नी सा आठवत असेल. विजू शाह संगीतकार, या एका गाण्यावर picture आणि हिरोईन हिट. असत एकेकाचे नशीब. असो.
किरवाणी
ह्या रागाचे नाव वेगळेच आहे. मला शाळा आठवते. आमच्या शाळेत दोन शिक्षक होते कीर आणि वाणी. “कीर” सर खेळ ,क्रिकेट वगैरे. त्याकाळी खेळाना विशेष महत्व देत नसत, मेरिट लिस्ट महत्वाची. त्यात ते square cut शिकवायला गेले कि वात्रट मुले याॅर्कर टाकायचे कि सर बोल्ड. मग ते चिडून सांगायचे,” अरे square cut चा बाॅल टाक रे.” मग बोलर स्टंपच्या बाहेर चेंडू टाकायचा आणि नंतर आम्ही त्यांनी मारलेली square cut बाउंड्री वरून आणायचो , मग आम्हाला “समजलं कि नाही?” असा प्रश्न. एकंदरीतच हा प्रकार कधीतरीच झाला असला तरी सरांवर विनोद करायला त्याकाळी पुरेसा.
दुसरे “वाणी” सर ‘वाणि’ज्य शिकवायचे. हा विषयसुद्धा टक्केवारीत न धरणारा त्यामुळे दुर्लक्षित. वाणी सर हुशार, स्टुडीयस आणि विषय रुक्ष, कंटाळवाणा. ते तरी तासाच्या शेवटी जोक वगैरे सांगायचे. त्यांच्या स्वभावानुसार आणि आम्ही त्यांच्यामते लहान म्हणून जोक अतिशय बाळबोध. संपल्यावर तेच सांगायचे झाला म्हणून. एकंदरीत असा “कीर”आणि “वाणी” चा संयोग असलेला राग नावामुळे थोडा नावडता होता. अर्थात पुढे मोठे झाल्यावर जसे दोन्ही सरांबद्दल आत्मीयता वाटली तशीच परिस्थिती या रागाची.
हा कर्नाटकी संगीतातून आलेला संपूर्ण राग. हा मेडिटेशन मध्ये वापरला जातो कारण याने खेळकर, आनंदी मूड निर्माण होतो. डिप्रेशन घालवायला वापरतात असे ऐकलं आहे. खरं खोटं तो मनोज किंवा शशांक कट्टी च जाणोत . राग पिलू याच्या सारखा मानतात.
अमोल पालेकर हा हिरो होऊ शकतो हे कळल्यावर एकंदरीतच समाजाचे डिप्रेशन गेल असं म्हणतात. त्यात तो “गोलमाल”करून “आनेवाला पल जानेवाला है “असं तत्वज्ञान सांगतो ते एकदम पटते. मग हा राग मस्त आपला वाटतो. मला खूप आवडलेलं गाणे म्हणजे “पुकारता चला हू मै “. OP Nayyar या माणसानी दोन गोष्टी मनापासून वापरल्या. एक म्हणजे घोडा गाडी चा ठेका आणि दुसरा म्हणजे हा राग.
आँखोंसे जो उतरी है दिलमे,
मै प्यार का राही हू
इतरही संगीतकारांनी हा राग छान वापरला आहे. किशोरने संगीत दिलेले “बेकरार दिल तू गाये जा “, रवी ने दिलेले अजरामर ” ये राते ये मौसम नदिका किनारा ” ही गाणी रागामुळे गेय झालीत आणि लक्षात राहतात. राजेश रोशन हा व्हायोलिन वापराने प्रसिद्ध पण त्याच “का करू सजनी आये न बालम ” हे येसूदास चे गाणे गाजले. अर्थात ओरिजिनल बडे गुलाम अलींचे असल्यामुळे राजेश रोशन चा कस लागला नाही.
आताच्या गुलाम अलींची एक गझल अप्रतिम आहे.
“ए हुस्न बेपर्वा तूझे शबनम कहू शोला कहू “.
या रागात इतकी सुंदर गाणी आहेत कि शेवटी म्हणावसं वाटते,
अभिजात संगीत हा फार मोठा आणि ह्रद्य विषय आहे. मी यावर काहीही लिहावे इतका माझा आवाका नाही. मी एक साधा “कानसेन”आहे. लहानपणापासून कानावर पडलेल्या श्रुती आणि संस्कार यांच्या आधारे राग या विषयावर काही लिहित आहे.
तस विलेपारले येथील जन्म आणि पार्ले टिळक शाळा या भांडवलावर कुठल्याही विषयावर बोलायचा जन्मसिद्ध हक्क प्राप्त असतोच. त्यात असे म्हणतात कि पार्ल्यात जन्माला आलेले मूल नर्स बाईला रागात रडून दाखवते. बर इथल्या खूपशा नर्सेससुध्दा “सिंबळी फूळीश” नसल्यामुळे त्याना तो राग कळतो म्हणे. असो. मी याच सार्या भांडवलावर हे लिहित आहे. अर्थात यात किचकट टेक्निकल गोष्टी टाळणार आहे. मला राग म्हणजे काय वाटते आणि काय अनुभूती येते त्यावर हा लेखन खटाटोप.
राग ज्ञान हे खूपच मोठे शास्त्र आहे. कोणीही कितीही अभ्यास केला तरी अजूनही खूप शिकणे बाकी आहे हेच कळते. संगीताच्या परीक्षा देणारे विद्यार्थी साधारणपणे सर्व टेक्निकल गोष्टी शिकतात. त्याना रागांचे आरोह, अवरोह, वादी संवादी वगैरे पाठ करावे लागतात. पास होण्यासाठी या सह एखाद लक्षण गीत पण यायला लागत. पूर्वी रेडिओवर संगीत सरिता असा एक कार्यक्रम सादर व्हायचा. एक राग घेऊन माहिती आणि शेवट त्यावर आधारित सिनेमातील गाणे. आपल्या पॆकी खूप संगीत प्रेमीनी तो ऎकला असेल.
राग या शब्दाचा अर्थ रंग असा आहे. आपण रागरंग अस म्हणतोच ना?. संगीतातला रंग म्हणजे बहुतेक मूड असा घेऊ. थोडक्यात काय तर एखाद्या संगीताने जी विशिष्ट वातावरण निर्मिती, मनस्थिती निर्माण होते त्याला राग म्हणूया. आपल्या अभिजात संगीतात सात स्वर आणि बावीस श्रुती आहेत. राग शास्त्र खूपसे बंदिस्त किंवा regimented वाटते. (ते तसे नाही). काही ठराविक स्वर आणि तेवढेच असतील तर तो राग मानला जातो. सर्वसाधारणपणे पाच किंवा जास्त सूर वापरले जातात. सातही वापरले तर राग संपूर्ण म्हटला जातो. अर्थातच नुसते तेच स्वर असूनही जर सूर जसे म्हटले जातात (रागाचे चलन) ते वेगळे असेल तर राग वेगळा. मियाकी मल्हार आणि बहार यांचे सूर सेम आहेत पण चलन वेगळे.
एक कथा सांगितली जाते. स्वर्गीय तानसेन यांचे पुत्र बिलासखान हे तानसेन मरण पावल्यावर श्रध्दांजली म्हणून गायला बसले. समयोचित राग भॆरवी निवडला. पण त्यांचे शास्त्रोक्त शिक्षण न झाल्यामुळे ते जे भॆरवी म्हणून गायले ते सूर बरोबर होते पण चलन चुकले आणि वेगळाच राग निर्माण झाला. त्या रागाचे नाव त्यांच्याच नावावरून पडले बिलासखानी तोडी.
आपल्या संगीतात किती राग आहेत या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. सर्वसाधारणपणे तीनशेच्या जवळपास माहिती असलेले राग आहेत. यात दररोज नविन भर पडू शकते. विलायत खानांच्या मते हा आकडा लाखाच्या वर जातो. या वर खूप अभ्यास झाला आहे. राग एवढे आहेत म्हणून त्यांचे वर्गीकरण करणे जरूरी वाटले. हे थाट. प्रत्येक थाटात एकाच पद्धतीचे अनेक राग धरले जातात. एकंदर दहा थाट मानले जातात. भॆरव,बिलावल, तोडी, आसावरी, कल्याण, खमाज, पूर्वी, मारवा, काफी आणि भॆरवी. स्वर्गीय विष्णू भातखंडे यांनी या श्रेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. हे जणू कमी पडले म्हणून दोन तीन राग एकत्र करून वेगळ्या रागांची निर्मिती होतच आहे.
हे जोड राग दोन्ही रागांची नावे एकामागोमाग त्यांची नावे लावून येतात. हे म्हणजे हल्ली मुली लग्नानंतर माहेर आणि सासरची आडनावे लावतात तसे. वसंतबहार, नटभॆरव वगैरे.
आता मुख्य गंमत, रागाचे सूर कळले तरी रागाचे चलन नीट कळायला आणि जमायला हवे. याच चीजा. यासाठी गुरू हवाच. ख्यातनाम गायकांच्या पोतडीत प्रत्येक रागाच्या असंख्य चीजा तयार असतात. जितक्या चीजा जास्त तेवढी गुरूची संपन्नता असते. असे श्रीमंत गुरूदेखिल चांगल्या शिष्यांच्या शोधात असतात. हे अभिजात संगीताचे ज्ञान असेच पिढी दर पिढी पुढे जात असते. प्रत्येक शिष्य आपापल्या वकुबानुसार यात भर घालत असतो. एक महत्त्वाचे म्हणजे आपण बघितले कि राग म्हणजे रंग किंवा मूड. तेव्हा हा प्रकारच subjective आहे. इथेच घराणे जन्माला येते. एकाच रागाची एकच रचना दोन वेगळ्या घराण्याचे गायक गातात तेव्हा वेगळीच अनुभूती येते. असे जरी असले तरी अभिजात संगीतात रागाचा आत्मा मात्र जपला जातो. अशानेच बरेच जाणकार चीजेवरून राग ओळखतात. काही सिध्दगळा गायक त्यांचा पहिला षड्ज लावतात तेव्हाच जाणकार श्रोत्याना रागाचा अंदाज येतो असे म्हणतात.
हल्ली अभिजात संगीत मॆफिलींना हजेरी लावणे आणि आपल्याला त्यातले बरेच कळते असे दाखवणारे बरेच भेटतात. पार्लयात दर्जेदार रसिक असतात पण ह्रदयेश किंवा बालगंधर्व मधे काही काही लोकस् आपण कसे दिसतो ह्या मधे जास्त मश्गूल असतात. प्रत्येक माणसाची राग सांगण्याची पद्धत बघायची असेल तर मध्यंतरात वडा स्टा्ॅलपाशी उभे रहा. “कॊशिकी पुरिया काय मस्त गायलीय “असा फालतू डायलॅाग मारणार असाल तर इथे एन्ट्री नाही. ” अण्णांनी मारवा काय पिसलाय म्हाइत्ये ९३ साली बालगंधर्व मधे?” “अर्थात तो काळच वेगळा होता”. हे म्हणणार्याचे वय बघितले तर भीमसेनजीनी मारवा गायला होता तेव्हा याला चड्डीची नाडी बांधता येत नसावी हा अंदाज कोणीही काढेल. पण वडा पॅाईंट गप्पा म्हणजे नो हयगय. मला नेहमी प्रश्न पडतात. ही लोक माझ्याच बाजूला येऊन अस का बोलतात आणि विचारावेसे वाटते ” पिसायला भीमसेन पत्ते खेळायचे कारे तुझ्याशी “. “आणि मारवा?” प्रत्येक रागाला आपल एक व्यक्तीमत्व असते. असो.
आता रागांच्या व्यक्तीमत्वाबाबत. काही राग आनंदी, खेळकर काही धीर गंभीर, काही रोमॅंटिक तर काही विरही. आता कोणी म्हणेल याला काय बेस आहे? राग आहे कशीही गाणी बसवा पण इथेच तर खरी गंमत आहे. रागांची सुरावट अशी असते कि त्याचा चेहरा दिसतोच. मारवा हा आर्तच असतो, बहार खेळतच येतो आणि भीमपलास अभंग गातच. मध्यंतरी एक शोध निबंध वाचनात आला. राग आणि त्यांचे मूड. शोध करणारे स्टॅटिस्टिकल टेक्निक घेऊन अभिजात संगीत कळणारे आणि न कळणारे लोकांबरोबर प्रयोग करून निष्कर्ष काढते झाले. काही राग हे शांती आणि सुख वाढवितात हंसध्वनि, तिलक कामोद,देश,यमन, रागेश्री, जोग. तर काही राग दु:ख, विरह,चिंता वगैरे मालकंस, श्री, मारवा, ललित, तोडी.
असे का हा प्रश्न सुटला नाही पण correlation असे निघाले कि सर्व शुध्द स्वर असणारे राग शांत, सुखी आणि कोमल स्वर असणारे दु:खी, विरहित आणि चिंतातुर. त्यातसुध्दा कोमल रिषभ असलेले राग यात प्रमुख. बहुतेक म्हणूनच हे राग गझल मधे जास्त वापरले जातात. अर्थात हे माझे वॆयक्तिक मत आहे आणि मी पार्लेकर असल्यामुळे….।॥ असो.
रागदारी ही फक्त classical गायकीची मक्तेदारी नाही. सिने संगीतात याच रागांवर आधारित असंख्य गाणी आहेत जी बरीच वर्षे होऊनसुध्दा अजूनही लोकप्रिय आहेत. यामधे विशेष लोकप्रिय राग यमन किंवा कल्याण. इतरही अनेक राग वापरले गेले आहेत. हिंदी चित्रपट संगीताने हा यमन राग वापरून आपल्या आधीच्या पिढीतील नायकांवर प्रचंड उपकार केले आहेत. ज्या नायकाना कधीच अभिनय आला नाही अशा भारत भूषण, प्रदीप कुमार आणि मनोज कुमार यांचे तर करियर घडवले. माझा भारत भूषण वर सर्वात जास्त राग कारण त्याला अभिनय कधीच आला नाही, चेहरा कायम परगोलॅक्स घेऊन सुध्दा दोन दिवस काही नाही असा, पण गाणे मिळाल ” जिंदगीभर नही भुलेगी वो बरसातकी रात”. राग यमन आणि गायक रफी म्हणून गाणे हिट. आणि समोर मधुबाला. काय भाग्य असत एकेकाच…… असो.
आत्ता इथेच थांबवतो. लेखनसीमा.
पुढील ब्लॅागस् मधे काही निवडक राग घेऊन त्यांच्यावर आधारित गाणी आणि राग विशेष वगैरे …थोडी वाट पहा.
आज सोशल मेडिया बराच प्रसिध्द आहे. आपला आवाज तिथे असावा, आपण तिथे व्यक्त व्हावे असे बहुतेक लोकाना वाटत असते. Twitter, Facebook आणि whatsapp ने लोकांची आयुष्य व्यापली आहेत. Whatsapp हे तर फारच वापरले जाणारे app आहे. बहुतेक लोक त्याचा वापर मित्रांशी बोलायला करतात. अर्थात त्यात लहान थोर सर्वच स्तरांवरील लोक असतात. आपल्याला वाटेल ते बिनधास्त बोलता येत त्यावर. नैसर्गिक बोलणे सोडल्यास आणखी बर्याच मजेदार गोष्टी आहेत त्यावर. त्यात सर्वात महत्वाचा म्हणजे फोटो आणि स्टेटस.
प्रत्येकाला आपण कसे दिसावं आणि लोकाना काय दाखवावे याचे एक जन्मजात आकर्षण असते. असे म्हणतात कि कोण प्रत्यक्षात कसा दिसतो बघायचे असेल तर आधार फोटोहून चांगला पण फेसबुक पेक्षा बेताचा धरावा. यात whatsapp चे स्टेटस आणि प्रोफाईल फोटो खूप महत्वाचा. मी जरा या गोष्टी बारकाईनं बघितल्या. इथे खरोखरीच व्यक्ती तितक्या प्रोफाईलस्. किंबहुना जास्तच कारण फोटो आणि स्टेटस कायम बदलता येते.
बहुतेक ५०% लोकांचे स्टेटस hey, I am using whatsapp असे निरूपद्रवी असते. बर्याच वेळा टेक्निकली चॅलेंज्ड असलेली लोक आणि ” काहीतरी भानगड नको” असे म्हणणारी त्यात येतात. बरेच लोक आपली धार्मिक वगैरे बाजू दाखवितात. ” जय श्रीराम” “जय जिनेंद्र” वगैरे वगैरे. काही लोक उगाचच उपदेश वगैरे. काही काही आपण किती सुखी आहोत हे किंवा आत्ता कुठे फिरतो आहोत हे टाकतात. काही गोपनीय लोक “can’t talk whatsapp only” असा दम देतात. एकाचा तर “battery dying” असा SOS पण बघितला. काही काही सरळ धमकीचे पण पाहिले. ” Don’t mistake silence for weakness” वगैरे. प्रेम आणि प्रेमभंग तर हातखंडा विषय या लोकांचे. परत स्टेटस आपणच लिहायला पाहिजे असे नाही, मग सरळ वाङमयचोर्य. एखाद स्टेटस चांगल वाटले कि पळवून आपलेसे करावे.
या सगळ्यात हल्ली सगळ्याचीच ऍप असतात. तशीच स्टेटस सुचविणारी पण बरीच आहेत. सर्वसामान्य माणूस त्या वाटेला चुकून गेलाच तर लगेच परत येईल ही गॅरंटी. या ऍप मधे शायरी असतात, चटकदार वाक्ये असतात, रोमॅंटिक , प्रेमभंग, दोस्ती, दुश्मनी, राजकारण, सर्वच मिळत. हल्ली दिवसागणिक बदलणार्या मूडप्रमाणे स्टेटस बदलणारे आहेत. अर्थात हे स्टेटस मस्त बॅकग्राउंडला लावून तेच फोटो म्हणून लावतात. आपला आजचा मूड काय आहे हेच जणू दाखवतात.
अर्थातच आपला स्टेटस का आपल्याकरता नसतोच मुळी. तो लोकानी बघावा आणि त्या बरहुकूम वागावे एवढीच माफक अपेक्षा असते या नेटकर्यांची. मला एकदा माझा एक ज्युनियर कलिग थोडा डिस्टर्बड दिसला. मी खोदून खोदून विचारल्यावर म्हणाला.” जगण्यात अर्थ नाही.” का रे? नंतर कळले कि हा हिंदी गाण्याची एखादी ओळ स्टेटस म्हणून टाकायचा. वाट बघायचा. ” तिचा” स्टेटस बघायचा. त्याचा परिणाम. मग त्याने नीट सांगितले. तो जे स्टेटस टाकायचा त्याचे उत्तर म्हणून तिने स्टेटस टाकावे अशी याची अपेक्षा. काही दिवस हा खुश होता पण नंतर तिचे अपेक्षित स्टेटस नसल्यामुळे हिरमुसला. परत डायरेक्ट विचारायची हिम्मत नाही. आता काय झाले विचारल तर म्हणाला कि त्याला कळलय कि ति याला उत्तरच देत नव्हती म्हणे. तिचे दुसर्याच कोणाबरोबर तरी स्टेटस स्टेटस खेळणे चालू होत तर. म्हणाला,” हे भयंकर आहे. कशावर विश्वास ठेवायचा आता? मला पूर्ण इग्नोर मारते आहे.” जगण्यात काय अर्थ आहे?”
हि एक extreme case सोडली तरी स्टेटस इतर लोकानी बघावे आणि आपल्याशी तसे वागावे अशी अपेक्षा बर्याच लोकांची दिसली.
आता प्रोफाईल फोटो. हा एक जिव्हाळ्याचा विषय, विषेषकरून स्त्री वर्गात. एकमेकींस फोटोवरून compliments देणे हा जाहीर भाग तर दुसरीशी बोलताना कसा १० वर्षापूर्वी चा फोटो टाकलाय अजून अशी मल्लीनाथी. बहुतेक पुरूषांच्या फोटोत ते कसे डॅशिंग वगैरे आहेत असे दाखविण्याचा अट्टाहास. मोटर सायकलवरचा फोटो हमखास. मुलींचा वनपीस किंवा मोकळे केस स्टाईल जास्त. लग्न झालेल्यांच्या फोटोत नवरा कायम बरोबर. अर्थात नवरा आणि ती दोघे त्यातल्यात्यात छान आणि जवळ असून हसताहेत असा दुर्मिळ फोटो.
आणखी एक ट्रेंड म्हणजे काही महत्वाच्या प्रसंगाचे फोटो स्टेटस म्हणून टाकणे. लग्न, समारंभ, इतर महत्त्वाचे इवेंटस चे फोटो स्टेटस म्हणून टाकणे आणि त्यावर स्वतः ची काहीतरी विनोदी का्ॅमेंट टाकणे हा एक टाईमपास. हल्ली लहान मुलांचे फोटो मात्र टाकू नयेत असा संकेत आहे, आजी,आजोबाना कितीही वाटले तरी.
मी उगाचच माझ्या मुलीला विचारले ” हल्ली काय ट्रेंड आहे स्टेटस चा?”
मुलीने क्लीनबोल्ड केला. ” हल्ली स्टेटस वगैरे कोणी जास्त बघत नाहीत.” मग काय बघतात? मी.
“Insta stories dad.” तुम्ही विडियो टाकू शकता आणि तो एकच दिवस ऍक्टिव राहतो. पण तुम्ही सोडा तुमच्या जनरेशनसाठी whatsapp स्टेटस बर आहे.
या उक्तीचा सरळ अर्थ जगात सर्वसुखी कोणीच नाही असा होतो पण हा केवळ ढोबळ अर्थ झाला. समर्थ रामदास हे द्रष्टे विचारवंत होते. आपल्या जीवनातील सुख आणि पूर्णता ही विचारी मनावर अवलंबून असते असा अर्थ त्याना अभिप्रेत आहे मला वाटतो. ज्याने आपल्या मनावर विजय मिळविला त्याला जगणे सुंदर आहे. बहुतेक लोकाना आधी आपले मन बघायला आणि वाचायला वेळ नसतो आणि कुवतही नसते. अशामुळे मनोविकार होतात. आजकाल विकारांच्या यादीत जगात पहिला क्रमांक मनोविकारांचाच आहे. या विकारांवर मात करण्यासाठी एक अनुभवी सल्लागाराची आवश्यकता असते. मनसि जात: इति मनोज अशा एका “मना”च्या “ओजस्वी” सल्लागार, तज्ञाची, आपल्या लाडक्या मनोजची गोष्ट.
मनोजकडे शाळेतील आदर्श विद्यार्थी. मनोजचा नंबर पहिला येणार हे गृहितच धरलेले असायचे. सतत पहिला क्रमांक येण्याचे दडपण मात्र नव्हते त्याच्यावर. त्याच्या घरातून पहिला येण्याची किंवा सतत अभ्यास करण्याची सक्ती कधीच झाली नाही. आईने वाचनाची आणि संगीतात ऋची निर्माण केली. विषयात खोली महत्त्वाची, नंबर पहिला महत्त्वाचा नाही अस ओपन वातावरण. वडिल साहित्यात ऋची असणारे त्यामुळे भाषा सुधारल्या.
चॊथी स्का्ॅलरशिप मधे महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने सुरूवात झालेली ही मालिका सतत चालू राहिली. बोर्डात नंबर, G.S. medical मधे बक्षिसे, M.D. ला गोल्ड मेडल वगैरे .. पण माझ्या मते एक बक्षिस आणखी मिळायला हवे होते, ते म्हणजे संपूर्ण शालेय जीवनात कधीच शिक्षा न झालेला विद्यार्थी हे.
अर्थात का्ॅलेज मधे अभ्यासाबरोबर म.वां.मंडळ, संगीताचे कार्यक्रम आणि नाटक. इथे तर तब्बल पाच वर्षे उन्मेष स्पर्धेत अभिनयात पहिला. मला त्याचा “पार्टनर” अजूनही आठवतोय. का्ॅलेजमधे असताना असा रोल करायला धारिष्ट लागत. मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणे आणि स्वतः स्वरबध्द केलेली गाणी गाणे हा छंद. चंदू बरोबर शास्त्रीय संगीताच्या अनेक मॆफिली ऎकल्या. ते संस्कार कसलेही formal शिक्षण नसताना त्याला एक संगीतकार बनविण्यात यशस्वी झाले. युववाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने यशवंत देवांशी गुरू, शिष्याचे नाते जडले ते कायमचे.
आपल्या वर्गातील एक भाटवडेकर (विकास) संगीतातील देवाची (मदन मोहन) गाणी छान म्हणतो, तर ह्याच्या पाठीवर खुद्द यशवंत “देवांचा” हात. देवांनी पण काहीही बाकी न ठेवता सर्व विद्या दिली.
इंटर्नशीप मधे कळले कि शरीराबरोबर किंबहुना त्याहूनही जास्त मनाचे सामर्थ्य आजार बरा करण्यास महत्त्वाचे असते. तेव्हापासून आधीचा निर्णय पक्का झाला. मानसोपचार तज्ञ होऊन समाजाचे जास्तीत जास्त सहाय्य करायचे. मग आवडता विषय असल्यामुळे गोल्ड मेडल तर मिळणारच होते. मनोजचे मेडिकलचे सर्व शिक्षण KEM मधेच झाले. Student, intern, Houseman, Registrar, Lecturer, Research Scientist पर्यंत.
पत्नी अंजली (हिर्लेकर) आपल्याच शाळेतील एक वर्ष junior. ती पण हुशार, NTS scholar, बोर्डात नंबर, KEM मधे MBBS. मनोज Houseman असताना अंजली intern होती. मनोजला आपल्या नावाचा दुसरा अर्थ “मदन” हा बहुतेक त्यावेळी समजला. मग काय Houseman साठी intern, housewife व्हायला लगेच तयार झाली. अंजू नंतर MD (PADEATRICS) बालरोग तज्ञ झाली आणि आजही कार्यरत आहे. True light पद्धतीने सुद्धा अनेकाना सहाय्य करत आहे.
मुलगा सत्यजीत खोल पाण्यात diving मधे अतिशय प्रवीण आहे. याच unconventional श्रेत्रात कार्यरत आहे. मनोज व अंजली दोघेही प्रतिथयश डा्ॅक्टर असूनसुद्धा त्यांनी मुलाला तेच करीयर निवडण्याची सक्ती केली नाहीये.
मनोजला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ पुरस्कार, कादंबरी लेखनात पुरस्कार आणि अनेक कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून सारखी बोलावणी. परत टीवीवर आरोग्यश्रेत्रातील जाणकार म्हणून. सध्या त्याची निवड “आधुनिक महाराष्टाचे शिल्पकार” या चरित्रकोषासाठी आरोग्यश्रेत्रासाठी झाली आहे. हा encyclopedia च्या धर्तीवर लवकरच प्रसिध्द होईल.
मनोज काही वर्षापूर्वी एका खूप मोठ्या आजारातून बाहेर पडला. त्याला rheumatoid arthritis झाला होता. या auto immune आजारात सर्व सांधे कमालीचे दुखतात. मनोज खरोखरच मृत्युच्या दारातून परत आला होता. मी त्याला विचारले, ” तो चित्रगुप्त काय म्हणाला तुला?”. मनोज हसत म्हणाला,” अरे तो खूप tense होता. आपल्याला भाजीचा हिशेब ठेवताना अवघड, त्याला इतक्या लोकांच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवायचा असतो. मी म्हटले पण ते काम तर तो नेहमीच करायचा आता काय वेगळे आहे? मनोज म्हणाला, “अरे हल्ली स्वर्गात सुध्दा सोशल मेडिया आला आहे ,खूप ट्रोल करतात इथले यक्ष.”
मग मनोजने त्याला मेडिटेशनचे पाठ दिले म्हणतात. एका सिटींगमधेच त्याने परत पाठवून दिले. असो. आपला फायदा झाला.
मनोजला श्रेत्र आवडीचे मिळाले पण पूर्वी लोकाना त्याच्याकडे यायला लागणे म्हणजे एक कमीपणा वाटायचा. एक प्रकारे सोशल स्टिगमा असायचा. हळूहळू त्याचा जम बसला कारण लोकाना वाटणारा विश्वास. त्याने आतापर्यंत ३०/४० हजार रूग्ण बघितले आहेत. आकडा ऎकून मलाच दडपण आले. आपण बहुतेक जरूर असताना सुध्दा याच्याकडे गेलो नाही बहुतेक..असो.
हे श्रेत्र अवघड आहे. बर्याच लोकाना आत्महत्येपासून परावृत्त केलयं याने. Deep depression मधून बाहेर काढलय. इतर समस्या सुध्दा वेगवेगळ्या. रूग्ण लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत. महिलांच्या समस्या सुध्दा मोठ्या. काही महिला खांद्यावर डोके ठेऊन रडणारी कॅटेगरी. अशा वेळी आपले डोके ठिकाणावर ठेवणे अवघड जात असणार याला. परत नक्की काय झालय कळायला इथे x ray, MRI,angiography काहीच मदत नाही. नक्की कुठे दुखतय हे अनुभवानेच कळणार. मी त्याला म्हटले दररोज बोलून बोलून तुला त्रास होतो का? मनोज म्हणाला,” अरे बोलायला कमीच लागत. आमच्या व्यवसायात मुख्य काम ऎकण्याचेच असते”. इथे त्याला त्याच्या मोठ्या कानांचा नक्कीच फायदा होत असणार. आपल्या वर्गातील बर्याच मुलानासुध्दा त्याने समुपदेशन केले आहे. बर एवढी सीक्रेटस माहित असताना बायकोलासुध्दा सांगायचे नाही हा नियम. हे तर बरच अवघड काम आहे. कदाचित यामुळे या श्रेत्रात पुरूष जास्त असावेत. (मला मार पडणार बहुतेक वर्गभगिनींकडून)
सतत कायम एवढे स्ट्रेसफुल काम करून सुध्दा हा हसतमुख. मी म्हटले कसा काय मॅनेज करतोस? तो म्हणाला “मेडिटेशन”. तुझा आवडता गुरू कोण? तो ” ओशो” मी सर्द. ओशों ची बरीच तारीफ करतो मनोज. त्याने जेन्युईन प्रयत्न केला मला समजवण्याचा त्यांची ध्यान प्रणाली. पण मला काही विशेष कळले नाही पण मनोज म्हणाला म्हणजे बरोबर असणारच. मी समजून घ्यायचा नाद सोडलाय.
मनोजचे असे म्हणणे आहे कि एक माणूस मनोविकारातून बरा झाला कि एक अखः कुटुंब सुखी होते. खरच आहे ते.
एका ना्ॅर्मल वाटणाऱ्या महिलेला नुसते बोलण्यावरून आणि रडण्यावरून मनोजने तिला ब्रेनमधे काहीतरी विकार आहे हे सांगितले. तिला ट्युमर होता,वेळीच इलाज झाला आणि जीव वाचला. अशा अनेक गोष्टी आहेत.
अर्थात पिकते तिथे विकत नाही. मी त्याला विचारले ” तुला समोरच्या माणसाचे मन कळते मग तुझी बायकोबरोबर भांडणे होतच नसतील ना?”. तो म्हणाला,” चूक, भांडणे होतातच पण पध्दत कदाचित वेगळी असेल. ती मला दररोज दाखवून देते मला किती शिकायचे आहे अजून”.
मनोजने इतरही समाजोपयोगी बरेच काम केले आहे विनामूल्य.
त्याने दहिसर येथे व्यसनमुक्ती केंद्र चालवून बर्याच लोकाना चांगल्या मार्गावर आणले आहे. लोकमान्य सेवा संघात बालक पालक केंद्र चालू करून लहान मुलांच्या समस्या सोडवल्या आहेत. Juvenile diabetics foundation चा तो एक trustee आहे. सातत्याने या कार्याला वेळ देणे ही मोठी गोष्ट आहे. मनोजचे काही कार्यक्रम Utube वर आहेत,जिज्ञासुंनी आवर्जून पहावेत.
मी विचार करत होतो मनोज काय करतो? मला वाटते मनोज लोकांच्या नीरस आयुष्यात रंग भरतो. मी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला,
“लोकांचे आयुष्य एक कॅनव्हाससारखे असते. काही कारणांमुळे त्यावर धूळ जमा होते. मी ती झटकतो.
मी म्हटले आणि त्यात नविन रंग भरतोस, तो म्हणाला, ” चूक, मी त्याच्या हातातली पॅलेट त्याला दाखवतो. रंग तोच भरतो.”
मी तरी भोचकपणे,” काही लोक कॅनव्हास डार्क करून टाकतात त्यावेळी काय करतोस?”
मनोज, ” काहीवेळा व्हाईट वा्ॅश द्यावा लागतो”.
त्याच्याकडे सगळ्यावर उत्तरे तयार असतात. मी नतमस्तक.
एवढे कार्य, इतक्या श्रेत्रात एवढी क्षमता, आणि तरी अजून जमिनीवर असलेले पाय, आपण नक्कीच लकी आहोत या अवलियाच्या इतक्या जवळ असताना.
आज मनोज समाधानी आहे, त्याला काय हव ते बरोबर माहित आहे आणि तो ते मिळवतोच. त्यामुळेच बकेट लिस्टच नाहिये. त्याला फक्त एकच खंत आहे. मनाजोगता रियाझ होत नाही. मी त्याच्यासाठी चांगली जागा शोधतोय. तुमच्याकडे आहे का? छोटीशी चालेल, पण मनापासून पाहिजे. असेल तर लगेच कळवा.